कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर खासगी शाळांमधील पहिलीच्या वर्गात सीबीएसई अभ्यासक्रम यंदापासून शिकवला जाणार आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेचा विचार करून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. जास्तीत जास्त चित्रांच्या माध्यमातून अक्षर आणि आकड्यांची ओळख, भारतातील संस्कृतीचे शिक्षण दिले जाणार आहे. सध्या जिल्हा परिषद, महापालिका आणि नगर पालिकांच्या शाळांसाठी पहिली सीबीएसई पॅटर्ननुसार तयार केलेल्या पुस्तकांचे वाटप तालुकास्तरावर सुरू आहे. 15 जूनपूर्वी शाळांपर्यंत पुस्तके पोहोचवली जाणार आहेत. 2 जूनपासून खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके विक्रीसाठी बाजारात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पहिलीला सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे. सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. ही पुस्तके वह्यांच्या पानांशिवाय असून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणारी आहेत. पाठ्यापुस्तक सीबीएसई बोर्डाची असली तरी महाराष्ट्र बोर्डानेच या पुस्तकांची निर्मिती केली आहे. शिक्षण तज्ञांच्या समितीचा सल्ला घेऊनच पुस्तके तयार केली आहेत.
या पुस्तकांमध्ये चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे. बालभारती, माय इंग्लिश बुक आणि गणित, हिंदी या पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. शासनाकडून संपूर्ण तयारी झाली आहे. पहिलीच्या पाठ्यापुस्तकांचे वितरण सुरू आहे. या पुस्तकांमधील अभ्यासक्रमाचे अध्यापन कसे करायचे, यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. तालुका स्तरावर सध्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रस्तर व त्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे 31 मेपर्यंत शाळांना पुस्तकांचे वितरण होईल. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
- पुस्तकातून काय शिकायला मिळणार
महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारणा, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, विज्ञान, गणित, पर्यावरण, सामान्यज्ञान, कला आणि हस्तकला, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, वेगवेगळे आकार, रंग, वस्तूंचे रेखाचित्र, हवामान आणि ऋतू, अन्न आणि पाणी प्रवास आणि सुरक्षितता, वनस्पती, कपडे, पाण्याचे स्त्रोत, पाणी व वीज वाचवा यासह अन्य अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सॉफ्ट स्किल्स शिकवली जातील. जेणेकरून या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून त्यांना भविष्यात रोजगाराची संधी किंवा व्यवसाय निर्मिती करण्यास मदत होईल. सुरूवातील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाणार आहे.
- शिक्षकांना प्रशिक्षण
पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांना 28 ते 30 मेपर्यंत जिल्हास्तरावर डायटमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे शिक्षक 2 जूनपासून तालुका स्तरावर प्रशिक्षण देतील. त्यानंतर 16 जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण दिले जाणार आहे.
- सीबीएसई पॅटर्न कोणत्या वर्गाला कधीपासून लागू होणार
2025-26 या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी.
2026-27 या शैक्षणिक वर्षात 2 री, 3 री, 4 थी व 6 वी
2027-28 या शैक्षणिक वर्षात 5 वी, 7 वी, 9 वी व 11 वी
2028-29 या शैक्षणिक वर्षात 8 वी 10 वी व 12 वी.








