पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर, हिरवाईचा साज अन् निसर्गाचा अद्भुत चमत्कार
By : इम्तियाज मुजावर
सातारा : दुष्काळासाठी ओळखला जाणारा माण तालुका सध्या अनोख्या आणि निसर्गनिर्मित दृश्यांमुळे चर्चेत आला आहे. सध्या घाटमाथ्यावर अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत जोराचा पाऊस झाल्याने वातावरण एकदम हिरवगार आणि थंडगार झालं आहे.
उंच डोंगरर धुक्याने माखले आहेत . तसेच उन्हाळ्याच्या कडाक्याने होरपळणाऱ्या भागात सध्या महाबळेश्वरसारखी थंड हवा, हिरवीगार माळराने आणि पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या भागांत रीघ लागली आहे.
साताऱ्यातील औंधच्या घाटमाथ्यावर आणि परिसरातील शेकडो एकर माळरानावर अचानक बदललेल्या वातावरणामुळे निसर्गप्रेमी आणि स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे हे दृश्य पाहणाऱ्यांना क्षणभर वाटतं की, आपण महाबळेश्वरच्या घाटात आहोत की माणच्या माळावर. अवकाळी पावसाने मे महिन्यातच थंडगार वातावरणाचा अनुभव दिल्याने निसर्गप्रेमी सुखावले आहेत.
मे महिन्यात माण तालुक्यातील तापमान उन्हाळ्यात सरासरी 40 ते 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. मात्र यंदा मे महिन्यात अचानक आलेल्या हवामान बदलामुळे परिसरात धुक्याची चादर पसरली असून, थंडीचा अनुभव येत आहे. डोंगरदर्यांवरून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. हाच मे महिन्यातील अनुभव घेण्यासाठी अनेकजण हजेरी लावत आहेत.








