सांगरूळ / गजानन लव्हटे :
वाहनांची वाढती संख्या, मेन रोडवरच असणारी दुकानांची व इतर व्यावसायिकांची भाऊगर्दी यामुळे करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावातून वाहतुकीची कोंडी होत आहे. यातून मार्ग काढत वाहन चालवताना अवजड वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे त्रस्त वाहन चालकातून ग्रामीण भागातील मेन रोडवरील या वाहतुकीला शिस्त कधी लागणार असा प्रश्न विचारला जात आहे .
- या गावातून होते वाहतुकीची कोंडी
सांगरुळ, बहिरेश्वर, कसबा बीड, शिरोली दुमाला ही करवीर तालुक्यातील मोठी गावे. सांगरूळ परिसरातील खटांगळे पासार्डे आमशी बोलोली उपवडेसह बारा वाड्या अन वस्त्या या गावच्या वाहतुकीसाठी सांगरूळमधील मेन रोड हा एकच मार्ग आहे. म्हारूळ बहिरेश्वर या भागातील वाहतूक सांगरूळमधून होत असते. हा रस्ता वाहतुकीच्या मानाने खूपच अरुंद आहे. सुमारे एक किलोमीटरच्या या रस्त्यावर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच राहते घरी आहेत अन्यथा सर्व इमारती व्यावसायिक आहेत. त्यातच या रस्त्याला असणारे एल कॉर्नर, चौक, लहान मोठी दुकाने, ग्रामपंचायत कार्यालय तसेच लहान मोठे व्यावसायिक यामुळे पादचारी व वाहन चालकांची मोठी गर्दी असते. या गर्दीतून अवजड वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागते. कसबा बीड गावातून परिसरातील गणेशवाडी सावरवाडीसह आरळे, घानवडे या गावची वाहतूक होते. या ठिकाणी गावातील रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. शिरोली दुमाला या ठिकाणीही रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक व दुकानांची संख्या मोठी असल्याने येथेही वाहतुकीची मोठी कोंडी होते.
- रस्त्यांचे रुंदीकरण नाही
ग्रामीण भागातील बहुतांशी गावातील रस्ते पूर्वीचेच आहेत. त्या काळात असणाऱ्या वाहतुकीच्या मानाने या रस्त्यांची रुंदी पुरेशी वाटत होती. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत गेली पण रस्ते मात्र आहे तेच राहिलेत. मेन रोडवर असलेल्या जागांचे बाजारमुल्य जास्त आहे. यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध राहतो. पर्यायाने रस्त्यांची रुंदीकरण फक्त चर्चेतच राहते.
- मेन रोडवर नेहमीच वर्दळ
गावागावातील मेन रोडवर व्यापारी व इतर व्यावसायिकांच्या दुकानांची संख्या राहत्या घरांच्या पेक्षा अधिक आहे. यामुळे या रस्त्यांच्या वर नागरिकांची सातत्याने आवक जावक सुरू राहते. काही ठिकाणी ग्राहकांना दुकानातील वस्तू दिसाव्यात म्हणून दुकानाच्या बाहेर वस्तू मांडल्या जातात. तसेच दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची वाहने सर्रास दुकानासमोर लावली जातात. त्यात चारचाकी वाहने असतील तर वाहतुकीची कोंडी अधिकच होते.
- वाहनांचा वाढता वापर
गावातल्या गावात विविध कारणासाठी प्रवास करताना दुचाकीचा वापर करण्याची सवय अंगवळणी पडली आहे. यामुळे पायी चालत होणाऱ्या कामासाठीही दुचाकीचा वापर वाढला आहे. यामुळे दुकानदारांच्या आणि व्यवसायिकांच्या दुकानासमोर गाड्यांची भाऊगर्दी होते.
- अनेकवेळा वादावादीचे प्रसंग
ग्रामीण भागातील वाहतुकीवर कोणाचेही बंधन नसल्याने रस्त्यामध्ये हवी तशी वाहने पार्किंग केली जातात. बऱ्याच वेळा एसटीसारखी अवजड वाहने रस्त्यावरून जात असताना रस्त्यात पार्किंग केलेल्या वाहनांना ती घासली जाताता. यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. एसटी महामंडळाने अनेक गावातील ग्रामपंचायतींना याबाबत नोटीस देत असे प्रकार घडल्यास एसटी वाहतूक बंद करण्याचे यापूर्वी कळवले आहे.
- रस्त्यातच भाजीपाला विक्री
गावातील भाजीपाला विक्रेते गावातील मुख्य चौकात रस्त्याकडेलाच सकाळी व सायंकाळच्या वेळी भाजीपाला विक्रीसाठी बसलेले असतात. यामुळे गावातील मुख्य चौकाच्या रस्त्यावर गर्दी होते. यामुळे अशा ठिकाणाहून सुरक्षितपणे वाहन चालवताना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते .
- वाहतुकीचे नियम धाब्यावर
शहरामध्ये वाहतुकीचे नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. या वाहतुकीवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण असते. ग्रामीण भागात अशा पद्धतीचे कोणाचेही नियंत्रण नाही. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत यामुळे ब्रयाच वेळी लहान मोठे अपघात घडत असतात यातून वादावादी होते .
- सकाळी, सायंकाळी वर्दळ
सकाळी दोन तीन तास कामावर जाण्याच्या वेळेस व सायंकाळी दोन-तीन तास कामावरून परत येण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहतुकीची गर्दी होते. यामध्ये वाहतुकीचे नियम तोडून बेफिकीरपणे वाहन चालवण्याची प्रकार ही घडत असतात. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अधिक प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते .








