चिपळूण / राजेश जाधव :
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही त्यावर मजेदार व्यंगचित्रे व संदेश तयार केले असून त्याच्या सोशल मिडीयावर सरी कोसळत आहेत. यामुळे एकापेक्षा एक सरस व भन्नाट अशा संदेशांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे.
गेल्या काही वर्षांचा विचार करता यावर्षी मे महिन्यात अवकाळी पाऊस जरा जास्तच कोसळत आहे. यामुळे शेतकरी, बागायदार, हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले असून सर्वसामान्यांची पावसाळी कामे तशीच राहिली आहेत. बांधकाम व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून शासकीय तसेच खासगी कामे पूर्णपणे बांबली आहेत. मे महिन्यातील विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजण पडले असून मंडप व्यावसायिकांचे साहित्य भिजत असल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. या साऱ्या घडामोडी, अडचणी डोळ्यासमोर ठेऊन नेटकऱ्यांनी या मान्सूनपूर्व पावसावर मजेदार संदेश तयार केले आहेत.

सध्या सोशल मिडीयावर ‘तुझ्या कॅलेंडरमधील मे महिन्याचे पान फाटलं का रे’ असा प्रश्न व्यंगचित्रातून निसर्गाला विचारण्यात आला असून है व्यंगचित्र व संदेश तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या स्टेटसला तो पहायला मिळत आहे. तसेच यावर्षी एप्रिलनंतर बेट जून.. आणि पाऊसच आला… छत्री बरं का… पाऊस आला आणि कानात हळूच सांगून गेला. गर्मी कोणाचीही असो जास्त काळ टिकत नाही, खरं तर पाऊस असा पडावा, त्यात गर्व बुडून जावा, मतभेद वाहून जावेत, अभिमान पूर्ण भिजावा, रागाचा पर्वत नष्ट व्हावा, द्वेष, भेदभावाची नदी गायब व्हावी आणि मी ऐवजी आम्ही सदा बरसत रहावं, कोकणात मे महिन्यातच जुलैचा फिल, येवा कोकण आपुलाच असा, अशा अनेक संदेशाची बरसात होत आहे. त्यामुळे साहजिकच पावसाच्या सरीत हे मनोरंजन नागरिकांसाठी ऊबदार ठरत आहे.








