रविशंकर प्रसाद यांनी केली भारताची भूमिका स्पष्ट : विविध शिष्टमंडळांचे दौरेही प्रगतीपथावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानबद्दलचे सत्य सांगण्यासाठी भारतातील शिष्टमंडळे जगातील विविध देशांमध्ये रवाना झाली आहेत. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रविवारी फ्रान्सला रवाना झाले. याप्रसंगी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारताना या विदेश दौऱ्यांमागील भारताची भूमिका स्पष्ट केली. भारत शांतता आणि सौहार्दावर विश्वास ठेवतो, पण जर आपल्या माता-भगिनींचे सिंदूर नष्ट झाले तर त्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ रविवारी भारतातून रवाना झाले आहे. हे शिष्टमंडळ 25 मे ते 7 जून या कालावधीत फ्रान्स, इटली, डेन्मार्क, इंग्लंड, बेल्जियम आणि जर्मनी या सहा युरोपीय देशांना भेट देईल. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सर्व 7 शिष्टमंडळे भारतातून रवाना झाली आहेत. यापैकी 6 शिष्टमंडळे त्यांच्या संबंधित नियुक्त देशांमध्ये पोहोचली आहेत. 21 मे रोजी दोन शिष्टमंडळे, 22 मे रोजी एक, 24 मे रोजी तीन आणि 25 मे रोजी एक शिष्टमंडळ परदेशात रवाना झाली.
विदेशी निघण्यापूर्वी रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम्ही जगाला स्पष्टपणे सांगू की भारत शांतता आणि सौहार्दावर विश्वास ठेवतो, परंतु जर निष्पाप भारतीयांवर क्रूर हल्ला झाला तर त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींच्या शरीराचे सिंदूर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे उत्तर देऊ. आम्ही जगाला सांगू की दहशतवाद हा एक जागतिक कर्करोग आहे आणि त्याचे केंद्र पाकिस्तान आहे. जगाने एकत्र येऊन या दहशतवादाविरुद्ध एका आवाजात बोलण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळात शिवसेना-यूबीटी खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी आहेत. त्यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला. आज पाकिस्तान ‘टेररिस्तान’ झाला आहे. सर्व दहशतवाद्यांची मुळे पाकिस्तानात आहेत. दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा आमचा संकल्प पाकिस्तानला कमकुवत करेल. ‘दहशतवाद’ संपविण्यासाठी आम्ही विविध देशांना भेटीगाठी देत आहोत, असे चतुर्वेदी म्हणाल्या.
दहशतवादाची सुरुवात पाकिस्तानमधून : ओवैसी
बहरीनला पोहोचलेल्या शिष्टमंडळात सहभागी असलेले एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानवर तोफ डागली आहे. भारताला किती वर्षांपासून दहशतवादाचा धोका आहे हे जगाला कळावे म्हणून आमच्या सरकारने आम्हाला येथे पाठवले आहे. दहशतवादाची ही समस्या पाकिस्तानपासून सुरू होते. जोपर्यंत पाकिस्तान या दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही, असा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानला मिळालेल्या उत्तराने मी आनंदी : थरुर
शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ शनिवारी रात्री उशिरा न्यूयॉर्कला पोहोचले. काँग्रेस खासदार थरूर म्हणाले, तुम्हाला माहिती आहेच की, मी सरकारसाठी काम करत नाही. मी एका विरोधी पक्षासाठी काम करतो, पण मला हे सांगायला आनंद होत आहे की भारताने पाकिस्तानला दिलेला प्रतिसाद अगदी योग्य होता. आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. आमची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी आणि आमच्या लोकांना 21 व्या शतकातील जगात आणण्यासाठी आम्हाला एकजुटीने काम करायचे आहे, असेही थरुर पुढे म्हणाले.
पाकिस्तानने दहशतवादी पायाभूत सुविधा संपवाव्यात : गुलाम नबी आझाद
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद सध्या बहरीनमध्ये आहेत. पाकिस्तानने दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त कराव्यात आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर आणि ओआयसीमध्ये (इस्लामिक सहकार्य संघटना) पाठिंबा हवा आहे. आम्हाला कोणत्याही देशाचा नाश करायचा नाही, असेही स्पष्ट केले.









