49 विमाने वळवली, हिमाचलमध्ये ढगफुटीसदृश, महामार्ग बंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत शनिवारी रात्री वादळासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे मिंटो रोड, मोती बाग आणि दिल्ली विमानतळ टर्मिनल-1 चे रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थानसह आजूबाजूच्या राज्यांमध्येही पावसाने दाणादाण उडवली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या वादळ आणि पावसामुळे एसीपी कार्यालयातील एका खोलीचे छत कोसळले. त्याखाली गाडल्याने उपनिरीक्षक (एसआय) वीरेंद्र मिश्रा यांचा मृत्यू झाला.
ढगफुटीसदृश पावसामुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे काही भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात सापडल्यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. डोंगरावरून ढिगारा पडल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-5 बंद झाला होता. राजस्थानमधील खैरथल-तिजारा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या वादळामुळे बिकानेर, सिकर आणि झुंझुनू येथे विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली. हनुमानगडमध्ये सर्वाधिक 53 मिमी पाऊस पडला.
दिल्लीत सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) पाणी साचल्यासंबंधी 40 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. येथे रात्री 11:30 ते पहाटे 5:30 पर्यंत वादळ 82 किमी प्रतितास वेगाने वाहत होते. दिल्लीत 3.2 इंच (81.2 मिमी) पर्यंत पाऊस पडल्यामुळे 100 हून अधिक उ•ाणांवर परिणाम झाला. रात्री 11:30 ते पहाटे 4:00 वाजेपर्यंत 49 विमानांचे उ•ाण वळवण्यात आले होते.









