बलूच नेत्याचे पंतप्रधान मोदींना आवाहन
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले आहेत. परंतु पाकिस्तानात एक लढाई अजून सुरू आहे. ही लढाई बलुचिस्तानच्या लोकांची असून ती पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात लढली जात आहे. या लढाईत पाकिस्तानच्या जुलूमी सैन्याच्या विरोधात आता बलूच लोक भारताला मदतीचे आवाहन करत आहेत. बलूच नेते डॉक्टर ताराचंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तान विरोधी लढाईत सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटला निर्णायक समर्थन देण्याचे भावुक आवाहन बलूच अमेरिकन काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तारा चंद यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. बलूच लोकांवर पाकिस्तानी सैन्याकडुन दशकांपासून होत असलेले अत्याचार, अपहरण, यातना आणि नरसंहाराविषयी डॉ. तारा चंद यांनी माहिती दिली आहे. त्यांनी एक जाहीर पत्र आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये हे सर्व लिहिले आहे.
पाठिशी उभे रहा
बलूच लोक पाकिस्तानच्या शासनात छळ अन् नरसंहार सहन करत आहेत. एक स्वतंत्र बलुचिस्तान शांतताप्रिय भारतासाठी आशीर्वाद असेल. कृपाकरून न्यायासाठी आमच्यासोबत उभे रहा असे तारा चंद यांनी पंतप्रधान मोदींना उद्देsशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बलुचिस्तानच्या मुद्द्यावर मोदींनी यापूर्वी लक्ष वेधले असल्याने डॉ. चंद यांनी त्यांचे कौतुक केले. नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण हे बलुचांसाठी आशेचा किरण ठरले. बलुचिस्तान कधीच पाकिस्तानचा हिस्सा होऊ इच्छित नव्हता. 1948 मध्ये इंग्रज निघून गेल्यावर बलुचिस्तानला बळाच्या जोरावर पाकिस्तानात सामील करण्यात आले. तेव्हापासून पाकिस्तानी सैन्याचा दहशतवादी छळ येथे जारी आहे. बलुचांचा मुद्दा भारताने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावा अशी मागणी डॉ. तारा चंद यांनी पत्राद्वारे केली आहे.
चीनची भूमिका अन् भू-राजकीय धोका
डॉ. तारा चंद यांनी बलुचिस्तानात चीनच्या वाढत्या भूमिकेला क्षेत्रीय स्थिरतेसाठी धोकादायक ठरविले. बलुचिस्तानची नैसर्गिक संपदा आणि याची रणनीतिक स्थिती याला क्षेत्रीय शांततेसाठी महत्त्वपूर्ण ठरविते. भारतीय प्रसारमाध्यमे वगळता पाकिस्तानकडून कब्जा करण्यात आलेल्या बलुचिस्तानात होत असलेल्या अत्याचारांची वाच्यता फारशी कुणी करत नाही. भारताने हा मुद्दा जागतिक स्तरावर उपस्थित करत जागरुकता निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
बलूच अमेरिकन काँग्रेस
बलूच अमेरिकन काँग्रेस ही एक नोंदणीकृत राजकीय संघटना आहे. ही संघटना बलूच राष्ट्रीय संघर्षाला आत्मनिर्णयाचा अधिकार मिळवून देणे आणि अमेरिकेत बलूच स्थलांतरितांच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय अधिकारांच्या रक्षणासाठी काम करते.









