हवेत कमालीचा गारठा : सखल भागात पाणी साचण्यासह मशागतीची कामे ठप्प : विहिरी-कूपनलिकांच्या पाणीपातळीमध्ये होतेय वाढ
बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप गेल्या तीन दिवसांपासून सुरूच असल्याने हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सखल भागात पाणी साचण्यासह विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला असला तरी शिवारात पाणी साचल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे मात्र ठप्प झाली आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. मात्र, अवकाळी पावसाने पाठ फिरवल्याने सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. मध्यंतरी अवकाळी पावसानेदेखील ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्याचबरोबर वीज कोसळून अनेक जणांचा बळीदेखील गेला.
अवकाळी पावसानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता मान्सूनपूर्व पावसाने गेल्या तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने सखल भागात पाणी साचण्यासह हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. मान्सूनपूर्व खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. धोकादायक झाडे हटविण्यासह हेस्कॉमकडूनही शहरात दुरुस्तीचे काम केले जात आहे. रविवारपासून मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे कूपनलिका आणि विहिरींच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. गुरुवारी सकाळीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली असली तरी शेतवडीत पाणी साचल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
बाजारपेठेत रेनकोट-छत्र्या विक्रीसाठी दाखल
गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजारपेठेत रेनकोट आणि छत्र्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे खरेदीसाठीही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषकरून गणपत गल्ली आणि पांगुळ गल्लीत छत्री व रेनकोटचे विविध नमुने विक्रीसाठी दाखल झाले आहेत.









