बेळगाव : लोकसभा निवडणूक काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढताना बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा दिल्याने कन्नड व मराठी भाषिकांत भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत समिती नेते व कार्यकर्त्यांवर 2024 मध्ये कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पाचवे दिवाणी जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी समिती नेते व कार्यकर्ते हजर झाले. या खटल्याची पुढील सुनावणी 31 जुलै रोजी होणार असून त्यावेळी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 24 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या काळात म. ए. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय के. के. कोप्प येथील प्राचार्य संतोष रावसाहेब जंगी यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी म. ए. समितीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप दाखल केला आहे. पाचवे दिवाणी जेएमएफसी न्यायालयात सुनावणीवेळी वरील सर्वजण हजर राहिले. 31 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या सर्वांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. अश्वजित चौधरी काम पाहत आहेत.









