महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई
बेळगाव : ताशिलदार गल्ली येथील एका स्वीट तयार करणाऱ्या भट्टीवर मनपाच्या आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकला. छाप्यादरम्यान 400 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडे महापालिकेचा व्यापार परवानादेखील नसल्याचे समोर आले आहे. केवळ आहार विभागाकडून घेण्यात आलेल्या परवान्यावर सदर भट्टी सुरू ठेवण्यात आली होती. ताशिलदार गल्ली येथील एका स्वीट तयार करणाऱ्या भट्टीत मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लास्टिकचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पर्यावरण निरीक्षक आनंद पिंपरे व इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या भट्टीवर छापा टाकला. छाप्यादरम्यान गुलाब जामून आणि लाडू पॅकिंग करण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यानुसार तेथून 400 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. सदर व्यावसायिकाकडे महापालिकेचा व्यापार परवाना नसल्याचे आढळून आले आहे. केवळ आहार विभागाकडून घेण्यात आलेल्या परवान्यावर त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला होता. अधिकाऱ्यांनी प्लास्टिक जप्त करण्यासह भट्टीचालकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी हालचाली चालविल्या होत्या.









