मुलांना शिक्षणाबरोबरच वेदाध्ययन, संगीत, संस्कृत, योग संस्कारांचा हेतू
बेळगाव : आध्यात्मिक आणि दार्शनिक परंपरा हे भारताचे वैभव आहे. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीने दिल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये याचा अंतर्भाव होता. मात्र, अलीकडे गुरुकुल परंपरा लुप्त होत आहे. ही दार्शनिक परंपरा पुन्हा जागरुक करणे आणि मुलांना शिक्षणाबरोबरच वेदाध्ययन, संगीत, संस्कृत, योग यांचे संस्कार करणे या हेतूने हल्याळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल उभारण्यात येत असल्याची माहिती मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ भारती यांनी दिली.
गुरुवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आज शाळा उदंड आहेत. परंतु अभ्यासापलीकडे तेथे अन्य शिक्षण मिळत नाही. शिक्षणाबरोबरच आज मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. मी आणि माझे या पलीकडे पाहण्याची गरज आहे. म्हणूनच गुरुकुल सुरू करण्यात येत आहे. छत्रपती शिवराय हे विश्वाचे नायक आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून तसेच जो पापाचे हरण करतो तो ‘श्रीहरी’. यासाठी गुरुकुलला श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल असे नाव दिले आहे. शिवाय हल्याळ हे मध्यवर्ती ठिकाण सर्वांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे हल्याळची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री ज्ञानेश्वर माऊली हे आमचे आराध्यदैवत असल्यामुळे या ठिकाणी कोणताही भाषाभेद नसेल. पंढरपूर, आळंदी येथून काही कीर्तनकार येणार आहेत. काशीहून पंडित आणि कन्नड भाषेतील वचन शिकविण्यासाठी कर्नाटकातील तज्ञ निमंत्रित करण्यात आले आहेत. ही सर्व मंडळी मुलांवर उत्तम संस्कार करतील. पाचवीपासून आध्यात्माची शिकवण दिली जाईल. हे सर्व शिक्षण विनामूल्य असेल. मात्र, जर येथे शाळा सुरू झाली तर शक्यतो विनामूल्य शिक्षण द्यावे असाच आमचा मनोदय आहे. मात्र त्यासाठी समाजाचा पाठिंबा आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर कर्नाटकामध्ये मराठा समाजाची भूमिका ही निर्णायक असेल. त्यामुळेच मराठा समाजाचा लाभ करून घेणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या गुरुकुलला आर्थिक पाठिंबा द्यावा. एखादी संस्था किंवा इमारत उभी करणे हे केवळ समाजाच्या पाठिंब्यानेच शक्य होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने यासाठी आर्थिक साहाय्य करावे. आपण राजकारण्यांना निवडून देतो, त्यामुळे त्यांच्याकडे गुरुकुलसाठी निधी मागण्यात संकोच करू नका. मराठा समाज हा जातीयवादी नाही व देशासाठी आपले बलिदान देणारा हा समाज आहे. या समाजाचा लाभ करून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या समाजासोबत राहावे व आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी गोपाळराव बिर्जे यांनी स्वागत केले. अनंत लाड यांनी स्वामींचा परिचय करून दिला. याप्रसंगी आप्पासाहेब गुरव उपस्थित होते.









