मान्सूनपूर्व पावसाचा दणका : पिकात केलेली गुंतवणूक वाया गेल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटण्याची भीती
वार्ताहर/जांबोटी
गेल्या दोन-चार दिवसांपासून जांबोटी-कणकुंबी भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हातातोंडाला आलेल्या उन्हाळी मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, प्रतिकुल वातावरणामुळे पिकलेली मिरची वाळविणे अशक्य होत आहे. मिरची कुजून जात असल्यामुळे उत्पादक शेतकरी वर्गाला हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. जांबोटी-कणकुंबी भागासह खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी वर्ग उन्हाळ्dयात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करतात. मिरची हे या भागातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. गोवा, कोकण तसेच किनारपट्टी भागात या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकरी वर्गांना यापासून ब्रयापैकी आर्थिक लाभ मिळतो. भात मळणीची कामे आटोपल्यानंतर डिसेंबर/जानेवारी महिन्यात शेतवडीत मिरची रोप लागवड करण्यात येते. एप्रिल, मे महिन्यापासून या भागात मिरची उत्पादनाला प्रारंभ होतो. मे महिन्यात मिरची उत्पादनाचा हंगाम ऐन बहरात असतो. सध्या या भागात सर्वत्र पिकलेली मिरची तोडणे व ती वाळवून विक्रीयोग्य करण्याच्या कामांना वेग आला आहे.
मिरची सुकविण्याच्या कामात व्यत्यय
मिरची वाळवण्यासाठी किमान आठदिवस कडक उन्हाची गरज असते. मात्र यावर्षी मिरची उत्पादनाच्या ऐन हंगामातच मान्सूनपूर्व पृवसाने थैमान घातल्यामुळे शेतवडीतील पिकलेली मिरची तोडून ती सुकविण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाल्याने मिरची पिकाचे नुकसान होत आहे. शेतवडीत पाणी साचल्यामुळे मिरची पिकासह रोपांचे देखील नुकसान होत आहे.
पाहणी करून नुकसानभरपाईची मागणी
वास्तविक मिरची रोप लागवडीपासून तोडणे, सुकविणे तसेच त्याची विक्री करण्यापर्यंतच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्य बळ व पैशाची आवश्यकता असते. मात्र सध्या पावसामुळे मिरची उत्पादकांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला असल्यामुळे मिरची पिकात केलेली गुंतवणूक वाया गेल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरी कृषी खाते व महसूल खात्याच्या अधिकारी वर्गाने पाहणी करून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.
पावसामुळे खरेदी दरात देखील घसरण होणार
सध्या मिरची खरेदीसाठी व्यापारी फिरत आहेत. वाळलेली मिरची प्रति किलो पाचशे रुपये दराप्रमाणे खरेदी करण्यात येत असल्यामुळे मिरची उत्पादक शेतक्रयांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळत होता. मात्र पावसामुळे मिरची पिके हातची वाया जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तसेच पावसामुळे खरेदी दरात देखील घसरण होणार असल्यामुळे शेतकरी वर्गांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









