आमदार विठ्ठल हलगेकर : मुख्याध्यापक बैठकीत विविध विषयांवर चर्चा अन् मार्गदर्शन
वार्ताहर/कणकुंबी
यावर्षी दहावी परीक्षेच्या निकालात खानापूर तालुका बेळगाव जिल्ह्याच्या टक्केवारीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात आतापासून मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून विविध शैक्षणिक कृतींच्या माध्यमातून दहावीचा निकाल वाढीसाठी प्रयत्न करून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. खानापूर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची बैठक गुरुवार दि. 22 रोजी शांतिनिकेतन हायस्कूलच्या सभागृहात ााली. अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते. 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ दि. 29 मे पासून होणार असून, प्रारंभोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्व शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक दाखल्यांची तयारी केली पाहिजे. फक्त परीक्षेदरम्यान तीन तास राबणाऱ्यांचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
दिवसेंदिवस परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. आपण आपापल्या विषयानुसार सुरूवातीपासून तयारी करावी आणी निकाल वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावा, असे सांगितले. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शंकर कम्मार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनेसंदर्भात माहिती देऊन शिक्षकांनी आतापासून विद्यार्थ्यांच्या हजेरी संदर्भात, शाळेतील विविध घटक चाचणी, सहामाही, नऊमाही, सराव परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी माध्यान आहार अधिकारी महांतेश कित्तूर, गट समन्वय अधिकारी ए. आर. अंबगी, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष एस. जी. चिगुळकर व बी. एन. चचडी उपस्थित होते. एस. जी. चिगुळकर यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर व गट शिक्षणाधिकारी ही रामाप्पा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व इतर उपस्थित होते.









