कोल्हापूर / इम्रान गवंडी :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) शव चिकित्सा विभागाची दुरवस्था गंभीर रूप धारण करत आहे. या विभागाबाहेर गटर व पाणी गळतीमुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेहासोबत येणाऱ्या नातेवाईकांना याठिकाणी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेंडापार्क येथे नव्याने बांधण्यात आलेला अद्ययावत शव चिकित्सा विभाग तयार असूनही त्याचा अद्याप वापर सुरू झालेला नाही. यामुळे नवीन सुरू होईना व जुन्याची दुरावस्था हटेना… अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुढील महिन्यापर्यंत शेंडापार्क येथील नवीन शवचिकित्सा विभाग सुरू होणार असल्याचे सीपीआर प्रशासनाने सांगितलें.
सीपीआर हे कोल्हापूरसह परजिल्हा व परराज्यातील गरजुंना आधरवड ठरले आहे. जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनातील मृतांच्या शवविच्छेदनासाठी सीपीआर हे एक प्रमुख केंद्र आहे. मात्र, शव चिकित्सा विभागातील समस्यांमुळे येथील सेवा व सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विभागासमोरच गटार व ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने तासंतास दुर्गंधीचा सामना करत बसावे लागत आहे. रात्रीअपरात्री शवविच्छेदनासाठी आलेल्या नातेवाईक, पोलीस, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. नातेवाइकांना अस्वच्छ वातावरण व समस्यांचा सामना करतच ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे शेंडापार्क येथील शवचिकित्सा विभाग लवकरात लवकर सुरू व्हावा, अशी मागणी नातेवाईकांतून होत आहे.
शव चिकित्सा विभागातील कर्मचारीही अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त आहेत. गटर तुंबने, पाणी गळतीची समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून असुन याबाबत वारंवार तक्रार देवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. विभागातील अपुरी यंत्रसामग्री व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे शवविच्छेदन प्रक्रियेला विलंब होत आहे.
- शेंडा पार्क येथील अद्ययावत शव चिकित्सा विभाग
दुसरीकडे, शेंडा पार्क येथे नव्याने बांधण्यात आलेला शव चिकित्सा विभाग अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहे. येथे आधुनिक यंत्रसामग्री, स्वच्छ वातावरण आणि पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र, ही सुविधा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. शव चिकित्सा विभागाचे सर्व काम पूर्ण झाले असुन लवकरच याचे लाकार्पण होणार असल्याचे सीपीआर प्रशासनाने सांगितले. शेंडा पार्क येथील विभाग सुरू झाल्यास सर्वच समस्यांची सोडवणूक होणार आहे.
- असा असेल नवा शवचिकित्सा विभाग
–अद्ययावत तंत्रज्ञ विकसित
–एकाचवेळी 5 मृतदेहांचे होणार शवविच्छेदन
–एक्स–रे रूमची सुविधा.
–मृतदेह ने–आण करण्यासाठी शववाहिकेची व्यवस्था
–मृतदेह ठेवण्यासाठी 25 शीतगृहांची व्यवस्था
–नवीन कर्मचारी नियुक्ती
–नातेवाईकांसाठी आसन व्यवस्था
–शवविच्छेदन विभागात एसटीपी प्लँटची उभारणी.
–फायर सेफ्टी रूम
- लवकरच नवीन शवचिकित्सा विभाग सुरू
शेंडा पार्क येथील नव्याने सुरू होणाऱ्या शवचिकित्सा विभाग अत्याधुनिक असणार आहे. याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञ विकसित केले आहे. नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शवविच्छेदन वेळेत होणार असल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागणार नाही.
डॉ. एस. एस. मोरे, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








