स्वप्नील जाधव, बेळगाव
मल्लविद्या ही तशी पुरातन काळापासून चाललेली. या विद्येला तसे पाहिले तर रामायण, महाभारतापासून ते राजर्षी शाहू महाराजांच्या काळापर्यंत ते सद्यपरिस्थितीत मोठे महत्त्व दिले जाते. ही परंपरा कायम राखण्यासाठी कुस्तीची दुसरी पंढरी म्हणून ओळखले जाणारे बेळगाव तरी कसे मागे राहिल? मध्यंतरी दुर्लक्षित झालेल्या मल्लविद्येला उर्जितावस्था देण्याचे काम बेळगावकरांनी केले. शुक्रवार दि. 23 मे हा जागतिक कुस्ती दिन म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्त भारतात सुरुवात झालेल्या या खेळाला ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे 23 मे 1904 रोजी पहिल्या जागतिक ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाला जागतिक कुस्ती दिन म्हणून घोषित करण्यात आले.
भारतासह 130 देशांत कुस्ती खेळली जाते. बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये कुस्तीची परंपरा जपण्याचे, मल्लांना प्रोत्साहन देण्याचे कार्य येथील विविध संघटना करीत आहेत. बेळगाव शहर व तालुक्यामध्ये वर्षभरात जत्रा, विविध सणादरम्यान, आनंदवाडी, येळ्ळूर, सांबरा, मजगाव, कणबर्गी, खानापूर, मुचंडी, मुतगा, उचगाव, कडोली, कंग्राळी, संतीबस्तवाड, निलजी, पिरनवाडी, तीर्थकुंडये, नंदगड, अळणावर, सावगाव आदी ठिकाणी मैदाने भरविले जातात. या मैदानातून लहान मोठ्या 50 ते 80 आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय पैलवानांच्या कुस्त्या ठरविल्या जातात. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात कुस्ती शौकिनांची वाढ झालेली दिसत आहे. कुस्तीला महाराष्ट्राने सर्वात माठे महत्त्व दिले असले तरी बेळगावने मात्र आपली परंपरा जपली आहे.
मल्लांना प्रोत्साहन, पाठिंबा, देण्याच्या कार्यात येथील संघटना व दानशूर व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. बेळगाव आखाड्यासहीत तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी 40 ते 50 कुस्तीची मैदाने भरविली जातात. म्हणून बेळगावला कुस्तीची दुसरी पंढरी म्हटले जाते. दरवर्षी होणाऱ्या या मैदानांत बेळगाव जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश व अन्य राज्यांतून मल्ल येतात. त्याशिवाय आंतराष्ट्रीय मल्ल इराण, युरोप, उझ्बेकिस्तान, कतार, अमेरिका बेळगावला मैदानासाठी उपस्थिती लावतात.
बेळगावच्या रेसकोर्स मैदानावर ब्रिटिश काळापासून मैदाने भरविली जात होती, आनंदवाडी आखाड्यात ठेकेदारी कुस्ती मैदाने भरविली जात होती. आनंदवाडीचा आखाडा पुन्हा पूर्वीप्रमाणे यशस्वीरित्या कार्यरत असून आज जिह्यातील प्रमुख कुस्तीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. देशातील अनेक लहान-मोठे दिग्गज मल्ल या आखाड्यात कुस्ती खेळले आहेत. दरवर्षी या आखाड्यात चार-पाच मैदाने होतात. काही काळासाठी या आखाड्यात खंड पडला होता. पण बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, मध्यवर्ती कुस्ती संघटना, चुडाप्पा हलगेकर कुस्ती संघटना यांनी कुस्तीची परंपरा चालू ठेवली आहे. युवा कार्यकर्त्यांच्या आणि येथील संघटनांच्या मेहनतीमुळे स्थानिक स्तरावर मल्लांची संख्या वाढली आणि आनंदवाडीचा आखाडा जिह्यात एक महत्त्वपूर्ण केंद्र बनले. प्रत्येक वर्षी या आखाड्यात कुस्त्या लढण्याची संधी स्थानिक मल्लांना मिळत असून याबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मल्ल उपस्थिती लावतात. यामुळे एक सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.
भारतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथांत मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किष्किंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुद्ध होऊन सुग्रीवाने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनानुसार कृष्ण, बलराम व भीम हे मल्लविद्येत प्रवीण होते, हे त्यांनी केलेल्या मल्लयुद्धांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुद्धात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुद्धात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधालाही ठार मारले होते. तेव्हापासून भारतामध्ये कुस्तीचे महत्व आहे. प्राचीन काळात हनुमंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती, जांबुवंती कुस्ती, जरासंधी कुस्ती, असे प्रमुख कुस्तीचे प्रकार होते. पूर्वीच्या काळापासून भारतीय क्रीडा क्षेत्रातील कुस्तीला महत्वाचे प्राधान्य दिले जात होते. भारतीय शारीरिक शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असलेली कुस्ती पारंपरिक काळात शालेय स्तरावर शिकवली जात होती आणि आजही ती आपल्या देशाच्या क्रीडा संस्कृतीत एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
बेळगाव शहरासह तालुक्यामध्ये खेळाडूंना सराव करण्यासाठी तालमी उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी लाल मातीच्या तालमी जीवित आहेत. मात्र सध्या शरीरसौष्ठवचे महत्त्व वाढले असल्याने तालमीचे रुपांतर आता जिममध्ये झालेले पहायला मिळते. यामुळे मल्लाना सराव करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून प्रत्येक गावात नव्या तालमी निर्माण करण्याकरीता प्रोत्साहन देण्यात, अशी अपेक्षा येथील संघटनांनी केली आहे. संघटना मैदाने भरवित आहेत, पण मल्लांना सराव आणि प्रशिक्षणासाठी कोल्हापूर, बेंगळूर, हल्याळ गाठावे लागत आहे.
हलगीवादक राजू आवळे
बेळगावच्या आखाड्यातील मल्लांचा आणि त्यांनी ठेकलेली मुडा अणि शड्डू, मैदानात होणारा हलगीचा ताल, घुमक, कैताळ आणि तुतारीच्या निनादामुळे बेळगावची वेगळी ओळख बनली आहे. बेळगावच्या कुस्ती मैदानात, महाराष्ट्र केसरी, कर्नाटक केसरी, उत्तरप्रदेश केसरी या स्पर्धेत हलगीवादन करत पैलवानांसमवेत मैदानाची फिरकी घेणे आणि मैदानात उपस्थित असलेल्या शौकिनांचा उत्साह वाढविण्याचे कार्य कुरुंदवाडचे माजी नगरसेवक व हलगीवादक राजू आवळेसह त्यांचे सहकारी कायम करीत असतात. कोल्हापूर, कुरूंदवाड येथील या परिवाराची ही 17 वी पिढी आपली पंरपरा जपत आहे.
आपली कला व बेळगावबाबत राजू आवळे म्हणतात की, मी मागील 25 वर्षे कुस्ती मैदानांमध्ये मोठा बदल होताना पाहत आलो आहे. कुस्ती शौकिनांची व मल्लांची वाढती संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान बेळगाव जिल्ह्यात 50 मैदाने गाजवितो. कलेबाबत म्हणतात की, आमचे वडीलधारी हलगी, घुमक, कैताळ वाजवायचे. त्यांचे वादन बघूनच मला ही कला अवगत झाली आहे. कुस्ती मैदानात महत्त्वाचे ताल, मर्दानी ताल, महाराष्ट्र ताल, डबलठेका, सिंगलठेका, करबलताल याबरोबर सनई-हलगीच्या निनादामुळे मैदानातील मल्ल आणि चाहत्यांचा उत्साह वाढू लागतो. मागील 43 वर्षांत सहा हजारहून अधिक मैदाने तर महाराष्ट्र केसरी 12, कर्नाटक केसरी 11, हिंद केसरी 7, उत्तरप्रदेश 1 अशी महत्त्वाची मैदाने वादनकलेने आम्ही गाजविली आहेत. राजू आवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपला पाय रोवला आहे. मी अमृता बोलते, भंडारा, भैरु पैलवान, कुस्तीत पहिले ऑलिम्पिक पदक मिळवणारे खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये त्यांना हलगी वाजवण्याची संधी मिळाली आहे.









