पॅलेस्टाईन समर्थक घोषणा देत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील ज्यू संग्रहालयाबाहेर एका व्यक्तीने इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. गोळीबारावेळी हल्लेखोर ‘आझाद, आझाद पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ज्यू म्युझियममधील एका कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर लगेचच तरुण जोडप्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी सांगितले. ज्या पद्धतीने ही घटना घडली त्यावरून हा एक सुनियोजित हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 9:05 वाजता गोळीबार झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोराने संग्रहालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या करण्यात आले. याप्रकरणी महानगर पोलीस प्रमुख पामेला स्मिथ यांच्या नेतृत्त्वात अधिक तपास केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी इस्रायली राजदूत घटनास्थळी नसल्यामुळे ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर एफबीआय फील्ड ऑफिससह अनेक पर्यटनस्थळे, संग्रहालये आणि सरकारी इमारती असलेल्या भागात संशयितांवर विशेष नजर ठेवली जात आहे.









