वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाने भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतात निर्मित रशियन असॉल्ट रायफल्सची अन्य देशांमध्ये निर्यात केली जाऊ शकेल. रशियाच्या निर्यात संस्थेने रशियन-भारतीय उपक्रमाला अन्य देशांना निर्यातीसाठी रशियन तंत्रज्ञानाने युक्त असॉल्ट रायफल्सच्या उत्पादनाची अनुमती दिली आहे. रोसोबोरोनएक्स्पोर्टच्या प्रमुखाने हा निर्णय जाहीर केला आहे.
भारतात एके-203 ची निर्मिती
अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथील प्रकल्प भारत आणि अन्य देशांसाठी उत्पादनांचा पुरवठा करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे रोसोबोरोनएक्सपोर्टच्या प्रमुखाने सांगितले आहे. एके-203 रायफलची निर्मिती करणारा हा प्रकल्प रशियन-भारत भागीदारीला मजबूत करेल आणि मेक इन इंडियाचे समर्थन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सैन्याला मिळाली पहिली खेप
अमेठी येथील इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड रशिया आणि भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या संख्येत एके-203 असॉल्ट रायफल्सच्या उत्पादनासाठी तयार आहे. मागील वर्षीच या प्रकल्पाने भारतीय सैन्याला 35 हजार सेट्सच्या पुरवठ्यासह पहिला टप्पा पूर्ण केला होता. प्रकल्पाने जानेवारी 2023 मध्ये 5 हजार रायफल्सचा पहिला सेट तयार केला होता. भारतीय सशस्त्र दलांच्या 6 लाखाहून अधिक रायफल्सच्या आवश्यकता पूर्ण करण्यासोबत हा प्रकल्प भविष्यात निर्यातही पूर्ण करणार आहे.
एके-203 रायफलची वैशिष्ट्यो
एके-203 असॉल्ट रायफल ही एके-200 रायफलचे एक वेरिएंट असून भारतीय सशस्त्र दलांकरता निर्माण करण्यात आली आहे. एके-200 सीरिजची ही रायफल एका मिनिटात 700 राउंड फायर करू शकते. सैन्याला रशियाकडून थेट 70 हजार रायफल्स यापूर्वीच मिळाल्या होत्या. अमेठी येथील कोरवा प्रकल्पाचे उद्घाटन 2019 मध्ये झाले होते.









