वृत्तसंस्था/श्रीनगर
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी स्वत:च्या पराक्रमाद्वारे पाकिस्ताला हादरविले. सीमेवर बीएसएफने देखील पाकिस्तानी रेंजर्सना धूळ चारली. चार दिवसांच्या संघर्षात जम्मू-काश्मीरच्या सीमेवर गोळीबार होत राहिला. संघर्षाच्या या वातावरणात बीएसएफच्या महिला तुकडीने महत्त्वाची भूमिका बजावली आणि फ्रंटलाइनवर जात पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. स्वत:च्या सहकारी जवानांसोबत मिळून महिला जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न उधळले, तसेच प्रत्युत्तरादाखल कारवाई करत शत्रूची पोस्ट नष्ट केली आहे.
अधिकाऱ्यांनी महिला जवानांना बटालियन मुख्यालयात स्थानांतरित होण्याचा पर्याय दिला होता. परंतु आव्हानाच्या या क्षणी कुठलीही महिला जवान मागे हटली नाही. बीएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने स्वत:च्या मुलीला परिवाराकडे सोपवत फ्रंटलाइनवर मोर्चा सांभाळला. या पूर्ण ऑपरेशनद्वारे महिलांनी आपण शक्तीचे प्रतीक आहोत हे सिद्ध करून दाखविल्याचे उद्गार बीएसएफचे उपमहानिरीक्षक वरिंदर दत्ता यांनी काढले आहेत. महिला जवानांनी शूरपणे शत्रूचा सामान केला आणि शत्रूला मोठे नुकसान पोहोचविले. महिला अधिकाऱ्याने शत्रूच्या एका पोस्टला पूर्णपणे नष्ट केल्याचे दत्ता यांनी सांगितले.
घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला
महिला सैनिक या शब्दाचा वापर टाळावा लागेल, कारण या महिला गणवेशात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. बीएसएफने 8 मे रोजी जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात 45-50 दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला होता, असे सांबा येथे तैनात बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.









