लखनौ सुपर जायंट्सना सनरायझर्स हैदराबादविऊद्ध दाऊण पराभव पत्करावा लागला आणि त्यांची ‘आयपीएल’मधून गच्छंती निश्चित झाली…त्यांनी 2022 नि 2023 मध्ये बाद फेरी गाठण्यात यश मिळविलं होतं. परंतु गतवर्षी आणि यंदाही त्याची पुनरावृत्ती ते घडवू शकले नाहीत. के. एल. राहुल वेगळा झाल्यानंतरही ‘आयपीएल’च्या महालिलावात ज्या प्रकारे खेळाडूंना त्यांच्याकडून करारबद्ध करण्यात आलं होतं ते पाहता हा संघ बलाढ्या अन् यंदाच्या विजेतेपदाच्या भक्कम दावेदारांपैकी एक वाटत होता. पण प्रत्यक्षात त्यास साजेशी कामगिरी त्यांच्या हातून घडलीच नाही…
- लखनौ सुपर जायंट्सच्या पतनाचं एक प्रमुख कारण म्हणजे महालिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या (27 कोटी रुपयांना करारबद्ध) कर्णधार रिषभ पंतची दयनीय कामगिरी…नुकत्याच गमवाव्या लागलेल्या हैदराबादविरुद्धच्या लढतीत देखील पंतचा क्रिझवरचा अल्पकाळाचा मुक्काम हे या हंगामातील त्याच्या संघर्षाचं स्पष्ट प्रतीक होतं…
- रिषभला फॉर्म पुन्हा मिळावा यासाठी या लढतीत ‘एलएसजी’नं त्याला बढती देऊन तिसऱ्या क्रमांकावर पाठविलं होतं. पण ही चाल अंगलट येऊन कर्णधार केवळ 7 धावा काढू शकला…12 सामन्यांत 12.27 च्या सरासरीनं फक्त 135 धावा आणि 100 चा स्ट्राईक रेट हे आकडे एकेकाळी जगभरातील गोलंदाज ज्याच्या हल्ल्याला घाबरायचे त्या खेळाडूच्या प्रतिमेला न शोभणारे…
- या हंगामात पंत अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला दिसला. शिवाय सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे त्याच्या फलंदाजीच्या स्थानात सतत झालेला बदल. त्यामुळं एक निश्चित भूमिका त्याच्या वाट्याला आली नाही…दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध तो चक्क सातव्या क्रमांकावर आला. 2016 नंतर पहिल्या सहा स्थानांच्या बाहेर फलंदाजीस येण्याची त्याची ही पहिलीच खेप…अब्दुल समद, डेव्हिड मिलर आणि आयुष बदोनी यांचं त्याच्या आधी फलंदाजीस येणं हे कर्णधाराच्या क्षमतेवर संघ व्यवस्थापनाचा कितपत विश्वास आहे असा प्रश्ऩ उपस्थित करून गेलं…
- बहुतेक सामन्यांमध्ये त्यांची मधली फळी आणि खालची फळी कोसळली. निकोलस पूरनसह ‘एलएसजी’च्या सलामीवीरांनी पॉवर प्ले’मध्ये मोठी फटकेबाजी केली. पण मधल्या फळीतील आणि खालच्या फळीतील फलंदाजांना त्यावर पाया रचण्यात अपयश आलं. अब्दुल समद व डेव्हिड मिलरसारखे खेळाडू देखील फिनिशरची भूमिका बजावण्यात अपयशी ठरले. यामुळं त्यांना अनेक सामने गमवावे लागले…
- लखनौसाठी दिग्वेश राठी हा संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक ठरला. त्यानं 14 बळी घेतले. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाला फारसे बळी मिळवता आले नाहीत. यामध्ये अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश राहिला. उल्लेखनीय म्हणजे या संघाचा ‘पॉवर प्ले’मधील ‘इकॉनॉमी रेट’ सर्वांत वाईट राहिला आणि यंदाच्या आयपीएलमधील शेवटच्या चार षटकांचा विचार करता खराब कामगिरीच्या यादीत त्यांचा क्रमांक लागतो चौथा…
- लखनौची गोलंदाजी कधीच प्रभावी ठरली नाही. रवी बिश्नोई अपेक्षेनुसार मारा करू शकला नाही आणि शेवटी त्याला वगळण्यात आलं, तर तुफानी वेगासाठी प्रसिद्ध मयंक यादव फक्त तीन सामने खेळल्यानंतर जखमी झाला. याव्यतिरिक्त त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहसिन खानही जखमी झाला अन् दुखापतींमुळंच आवेश खानची उपलब्धता अनिश्चिततेच्या गर्तेंत सापडली. त्यामुळं त्यांच्या माऱ्यामध्ये ‘फायर पॉवर’ कधी दिसलीच नाही…
- मैदानावरील समस्या कमी म्हणून की काय विविध दाव्यांनुसार, त्यांचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि संघाचे मार्गदर्शक झहीर खान यांच्यातील संबंध लक्षणीय प्रमाणात बिघडलेत. त्यामुळंही कामगिरीवर नि:संशयपणे परिणाम झाला…
– राजू प्रभू









