खेड :
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर गणेशोत्सवात चालवण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ६० दिवस आधी म्हणजेच २३ जूनपासून खुले होणार असल्याने गणेशभक्त आतापासूनच कमालीचे सुखावले आहेत. नियमित रेल्वे गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढ सुरू होणार आहे.
शिमगोत्सवापाठोपाठ गणेशोत्सवातही चाकरमानी घरच्या गणरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने कोकणात डेरेदाखल होतात. कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे बुकींग अवघ्या काही मिनिटातच फुल्ल होते. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवर तासन्तास ताटकळत उभे राहूनही चाकरमान्यांचा हिरमोड होतो.
यावर्षी २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त चालवण्यात येणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटासाठी ऑनलाईनप्रमाणेच तिकीट खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे. आरक्षित तिकिटांवर दरवर्षी दलालच डल्ला मारतात. यामुळे दलालांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करणे भाग पडणार आहे.
गणेशोत्सवात कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही. मात्र २३ जूनपासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार असल्याने चाकरमान्यांना गणरायाच्या दर्शनासाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुलभहोणार आहे. नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण अवध्या काही मिनिटातच फुल्ल होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना प्रतीक्षा यादीवरच रहावे लागते. यामुळे गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा झाल्यास प्रवाशांना नियोजन करणे सुलभ होईल, असा सूर आळवला जात आहे. शिमगोत्सवात पनवेल-चिपळूण अनारक्षित मेमूसह रेल्वे प्रशासनाने दादर-रत्नागिरी अनारक्षित स्पेशलच्या फेऱ्या चालवत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला होता. शिवाय अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाही सुरू ठेवला होता. गणेशोत्सवातही याच ‘फॉर्म्युल्या’चा अवलंब करत आतापासूनच नियोजनाच्या आखणीवर भर दिल्यास चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर होऊन प्रवासही सुखकर होईल. पश्चिम रेल्वेनेही वसईमार्गे गणपती स्पेशलच्या अधिक फेऱ्या चालवण्याची मागणीही होत आहे.
- गणेशभक्तांना नियोजन करणे होईल सुकर
६० दिवस आधी रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होणार असल्याने गणेशभक्तांना नियोजन करणे सुकर होणार आहे. सामान्य, महिला, ज्येष्ठ नागरिक यांसारख्या विविध राखीव जागांचा लाभ घ्यावा, ज्येष्ठ नागरिक कोटा ४५ वषपिक्षा जास्त वयाच्या महिला व ६० वर्षपिक्षा जास्त वयाचे पुरुष अशा प्रवाशांना एका तिकिटावर जास्तीतजास्त २ प्रवाशांना लागू होतो, त्याचाही उपयोग करून घ्यावा, असे कळवा-ठाणेतील रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी सांगितले.








