कोल्हापूर :
पाल (ता. भुदरगड) येथील संकेत सर्जेराव पाटीलने भारतीय क्रिकेट संघातील जगविख्यात खेळाडू विराट कोहलीवरील प्रेम पुस्तक ऊपाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने विराट कोहलीच्या विचारांवर आधारीत ‘दी वन परसेंट थेअरी : बिल्डींग सक्सेस फ्रॉम बिलीफ’ हे इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिले आहे. 61 पानांच्या या पुस्तकाचे प्रकाशन करीन तर विराट कोहलीच्याच हस्ते असेही संकेतने पक्के केले आहे.
विराट कोहलीला टीव्हीच्या माध्यमातून क्रिकेट सामने खेळताना जसे पाहतोय तेव्हापासूनच त्याचा संकेत हा फॅन झाला आहे. विराट हा क्रिकेटच्या मैदानात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नाव कमवत तर आहेच, शिवाय त्याचे विचारही उत्कृष्टच असून ते माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील, असे आहे. विराटने सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल केली होती. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, जीवनात सक्सेस होण्यासाठी आपल्याकडे असलेला एक टक्का चान्सही फार महत्वाचा आहे. या चान्सच्या जोरावर आपण सक्सेस होऊ शकतो. विराटची ही पोस्ट संकेतच्या मनाला भावली आणि त्याच क्षणी त्याने विराटच्या विचारांवर आधारीत इंग्रजीत पुस्तक लिहिण्याचा निर्धार केला. तो सध्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
विराटचा दी वन परसेंट थेअरी या विचाराचा अभ्यास कऊन त्यावर पुस्तक लिहिण्यासाठी संकेतला तब्बल 3 महिने लागले. त्याने पुस्तकात दी पॉवर ऑफ बिलीफ, दी वन परसेंट माईंडसेट, बिल्डींग रेझिलन्स थ्रायविंग अंडरप्रेशर यासह 8 प्रकरणे मांडली आहेत. या प्रकरणांमधून विराटचे विचार, जीवनातील त्याचा संघर्ष, यश, मानसिक ताकद आदींची मांडणी केली आहे. शिवाय आठही प्रकरणांमधून लोकांनो तुमच्यातील आत्मविश्वास जागा करा, मेहनतीचं महत्त्व जाणून घ्या, यशाकडे जाण्यासाठी नवा दृष्टिकोन ठेवा, आयुष्यात यशस्वी होण्याठी स्वप्ने पहा, अपयशाने खचून न जाता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा, असे संकेतला पुस्तकातून सांगायचे आहे. संकेत हा पुढील महिन्यात मुंबईत जाऊन विराट भेट घेणार आहे. तेथे विराटला भेटून त्याच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करणार आहे.
- पुस्तकाच्या प्रति काढण्याबाबत विराटशी चर्चा करणार…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पदाधिकाऱ्यांना विराट कोहलीच्या विचारावरील पुस्तकाची माहिती व्हावी म्हणून एमसीएचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार यांना पुस्तक भेट दिले आहे. आता मुंबईत विराटची भेट घेऊन त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन तर केले जाईल. शिवाय विराटला पुस्तक वाचायला देऊन त्याच्या प्रति किती काढायच्या याबाबत चर्चा करणार आहे.
संकेत पाटील (विराटचा चाहता)








