कोल्हापूर :
शहराचा विस्तार झाल्यामुळे उपनगरात नागरिकीकरण मोठया प्रमाणात झाले आहे. बांधकामांची संख्या प्रचंड वाढली आहे. बांधकामांसाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचा केला जात नाही. यामुळे ओढे आणि नाल्याच्या पात्रात बांधकामे होत आहेत. मोरेवाडी–शांतीनिकेतन मार्गावरील ओढ्याचा झालेला नाला हे ज्वलंत उदाहरण आहे.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या सात लाखाच्या पुढे गेली आहे.यामुळे शहरात बांधकामांवर मर्यादा आल्या आहेत.शहरात जागा नसल्याने अतिक्रमण मोठया प्रमाणात वाढले आहे.पण या अतिक्रमणाची हद्द झाली आहे.महापालिकेसह संबंधित यंत्रणेचे यावर नियंत्रण नसल्याने कोणीही उठून कुठेही अतिक्रमण करत आहे.अतिक्रमणामुळे शहरातील नाले गायब झाले आहेत.नाल्याच्या काठावर तर काही भागात नाल्यावरच मोठी बांधकामे केली आहेत. आता उपनगरात हा प्रकार सर्रास सुरु आहे.पूर्वी मोठा ओढा असलेल्या ठिकाणी बांधकाम करुन नाला केला आता नाल्याची गटार होत आहे.
मोरेवाडी –शांतीनिकेतन मार्गावरील ओढयाचे हे वास्तव चित्र आहे.या मार्गावर पाच वर्षापूर्वी मोठा ओढा होता.हा ओढा चित्रनगरीकडून –मोरेवाडी–शिवाजी विद्यापीठातून पुढे एसएससी बोर्ड असा जातो.पण मोरेवाडी गावात आणि मोरेवाडी –शांतीनिकेतन मार्गावर असलेल्या पूलाच्या ठिकाणी भव्य बांधकामामुळे ओढा चिंचोळा झाला आहे.यामुळे सद्या ओढा नव्हे तर नाला म्हणण्याची वेळ आली आहे.कालांतराने चिंचोळा नालाही गायबही होईल.पण त्यावेळी नैसर्गिक आपत्तीला येथील स्थानिक नागरिकांनाच सामोरे जावे लागणार आहे.पाणी पुढे जाण्यासाठी मार्ग राहणार नसल्याने मागे तुंबणार आहे.यामुळे कदाचित पूलावर पाणी येऊन मुख्य रस्ताही पावसाळयात बंद होऊ शकतो.अशा बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन ओढे आणि नाल्यावर होणारी बांधकामे थांबवण्याची गरज आहे.
- उपनगरात बांधकामे वाढली
शहरात सद्या जागाच राहिली नाही.यामुळे नागरिक शहराच्या दक्षिण भागात वळत आहेत.यामुळे येथील जागेचे दर गगनाला भिडले आहेत.काही वर्षापूर्वी मोकळा असणारा चित्रनगरीचा माळ आज बांधकामाच्या मोठया प्रकल्पामुळे व्यापला आहे.मोरेवाडी परिसरात सुध्दा आज मिळत नसल्याचे चित्र आहे.पण येथील बांधकामे नैसर्गिक ओढे आणि नाल्यांच्या मूळावर येत आहेत.
- महापालिका कारवाई करणार का?
ओढे,नाल्याच्या काठावर अतिक्रमण करुन सर्रास बांधकाम होत आहेत.मोठया बांधकामासाठी परवाना देताना महापालिकेला ओढे,नाले मुजत असल्याचे दिसत नाही का अशी विचारणा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.महापालिका अशा बांधकामांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.








