बेळगाव : फोर्ट रोडवरील नाल्यावर काही जणांनी अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या दुकाने थाटली आहेत. त्यामुळे नालासफाई करण्यात अडचण निर्माण होत असल्याने पावसाळ्यात सांडपाणी वाहून जाणे कठीण झाले आहे. सदर दुकानांना कोणी परवानगी दिली आहे, असा सवाल बुधवारच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत उपस्थित करण्यात आला. तातडीने नाल्यावरील बेकायदेशीर दुकाने हटविण्यात यावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांना बैठकीत करण्यात आली. फोर्ट रोडवर असलेल्या नाल्यावर अनेक जणांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. त्यांना हेस्कॉमकडून वीज कनेक्शनदेखील देण्यात आले आहे. त्यामुळे नाल्यावर दुकाने थाटण्यास त्यांना कोणी परवानगी दिली आहे, अशी विचारणा सदस्यांनी बैठकीत केली. त्याचबरोबर विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी यांनी फोर्ट रोडवरील नाल्यावर झालेल्या अतिक्रमणाची सविस्तर माहिती बैठकीत दिली.
यापूर्वी महापालिकेचे अधिकारी एखाद्या ठिकाणी कारवाईसाठी गेले असता कोणत्या प्रकारचा विरोध न करता अतिक्रमण हटविले जात होते. मात्र आता परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दबदबा व वचक कमी झाल्याने कोणीही त्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणारे आम्ही दुकाने काढणार नाही, कोण येतय येऊ दे? असे उत्तर देत आहेत. या अतिक्रमित दुकानांमुळे नाल्याची सफाई करणे कठीण झाले असल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. परिणामी सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याने पाणी मुख्य रस्त्यावर पसरण्यासह घरामध्ये शिरत आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत तातडीने फोर्ट रोडवरील नाल्यावर बांधण्यात आलेली दुकाने तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी अधिकाऱ्यांना सबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याबाबत सूचना केली.









