विमानांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना : हवामान खात्याशी संपर्काची सूचना
बेळगाव : मान्सून दाखल होण्यास अवघे दहा ते पंधरा दिवस शिल्लक असल्याने बेळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून मान्सूनमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढगाळ वातावरण अथवा पावसाचा जोर वाढल्यास विमानांची वाहतूक कशी करावी? यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी उपस्थितांचे स्वागत करून मान्सूनमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. बऱ्याच वेळा खराब हवामानामुळे धावपट्टीवर विमानाचे लँडिंग करणे शक्य होत नाही. अशावेळी जवळच्या विमानतळावर विमान घेऊन जावे लागते. अशा स्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात. तसेच धावपट्टी लवकर दृष्टीस पडावी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील वर्षी अनेक वेळा खराब हवामानामुळे पावसाळ्यात विमान इतर विमानतळांवर उतरावे लागले होते. पावसाचा जोर वाढल्यास धावपट्टीच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली. तसेच विमानतळाच्या हवामान खात्याशी सतत संपर्क ठेवण्याची सूचना करण्यात आली. यावेळी सुरक्षा अधिकारी तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.









