बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय : जूनच्या पहिल्या आठवड्यात नाले सफाईचे काम पूर्ण करा
बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बुधवारी महापालिकेत झालेल्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाल्याच्या सफाईचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी सूचना अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती अधिकाऱ्यांना केली. शुक्रवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता नाल्याच्या सफाईची प्रत्यक्ष महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत पाहणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बुधवारी स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयतीर्थ सौंदत्ती होते. त्याचबरोबर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते अॅड. हनुमंत कोंगाली, विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी, सदस्य शिवाजी मंडोळकर यांच्यासह इतर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी उपस्थितांचे स्वागत करून मागच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्याचबरोबर विषय पत्रिकेवरील विषय सभागृहासमोर मांडले. यावेळी प्रामुख्याने शहरातील नाल्यांच्या सफाईवर चर्चा करण्यात आली. शहरातील नाल्यांची सफाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी स्थानिक नगरसेवकांना मात्र याची माहिती दिली जात नाही. त्यामुळे यापुढे नगरसेवकांना माहिती देऊनच त्यांच्या प्रभागात कोणतेही काम हाती घ्यावे. शाहूनगर, केएचबी कॉलनी, हिंडलगा, सह्याद्रीनगर, विनायकनगर आदी ठिकाणच्या नाल्यांची सफाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्याठिकाणचे जीपीएस फोटो, किती किलोमीटरपर्यंत नाल्यांची सफाई करण्यात आली आहे व त्याठिकाणी कोण होते, आणि वेळ? पुढील बैठकीत माहिती द्यावी, असे अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
पाटील मळा येथील नाल्याची सफाई करण्यात आल्यानंतर गाळ बाजूलाच टाकण्यात आला आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा तो गाळ नाल्यातच मिसळतो. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात असले तरी त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत, असे सांगितल्यानंतर तातडीने सदर गाळाची उचल केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात दोनवेळा नाल्यांची सफाई केली जाते असे अधीक्षक अभियंता निपाणीकर यांनी सांगितले. ओल्ड गांधीनगर येथील नाल्याची सफाई झाली नसल्याने सफाईचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. बांधकाम झालेले नाले पर्यावरण विभागाकडे येतात तर कच्चे नाले बांधकाम विभागाकडे येतात. त्यामुळे आमच्याकडून केवळ कच्च्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. समर्थनगर येथील लेंडी नाल्याची सफाई सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात समर्थनगर आणि हरिकाका कंपाऊंडमध्ये पाणी शिरत असल्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी बैठकीत सदस्यांनी केली.
जूनच्या पहिल्या आठवड्यात काम पूर्ण करा
त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाले सफाईचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी सूचना अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केली. त्याचबरोबर शुक्रवारी महापौर, उपमहापौर व नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरातील नाले सफाईची पाहणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.









