वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील कसोटी सामना आज गुरुवारपासून सुरू होत असून इंग्लंडसाठी आगामी कठीण परीक्षांपूर्वीचा हा एक सराव सामना आहे, तर झिम्बाब्वेच्या दृष्टीने तो सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण आहे. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजमध्ये हा चार दिवसांचा कसोटी सामना होणार असून नेहमीच्या पाच दिवसांच्या स्वरुपाहून वेगळ्या पद्धतीची कसोटी लढत खेळविण्याच्या दुर्मिळ घटनांपैकी ही एक आहे. परंतु कदाचित तो भविष्यकाळ कसा असेल याचा संकेतही मानता येईल.
इंग्लंड आणि झिम्बाब्वे केपटाऊनमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वचषक सामन्यानंतर मागील 18 वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच यानिमित्ताने आमनेसामने येतील. 2003 मध्ये चेस्टर-ले-स्ट्रीटवर जेव्हा 20 वर्षीय जिमी अँडरसन त्याच्या पहिल्या मालिकेत खेळला होता तो या दोन संघांमधील यापूर्वीचा शेवटचा कसोटी सामना होता. झिम्बाब्वेचे इंग्लंडच्या भूमीवर पुनरागमन दोन दशकांनंतर झाले आहे. राजकीय हस्तक्षेप, खराब प्रशासन आणि निर्बंधांनंतर या आफ्रिकन राष्ट्राचे कसोटी क्रिकेटमध्ये हळूहळू पुनरागमन झालेले आहे.
वरील बाबींमुळे संघाला सुमारे सहा वर्षे कसोटी क्रिकेटमधून हद्दपार करण्यात आले होते. 2005 ते 2011 या कालावधीत झिम्बाब्वे संघ एकही कसोटी खेळला नाही. 2022 ते 24 पर्यंत ते फक्त चार कसोटी सामने खेळले. पण गेल्या वर्षीचा डिसेंबर ते यावर्षी ऑगस्टदरम्यान त्यांचे 10 कसोटी सामने होतील. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविऊद्ध या उन्हाळ्यात त्यांच्या दोन सामन्यांच्या मालिका होणार आहेत. झिम्बाब्वे अजूनही जागतिक कसोटी स्पर्धेचा भाग नाही, पण हळूहळू तो देश प्रगती करत आहे. झिम्बाब्वे इंग्लंडला फारसा प्रतिकार करण्याची अपेक्षा नाही, गेल्या आठवड्यात लेस्टरमध्ये व्यावसायिक काउंटी क्लब सिलेक्ट इलेव्हनकडून त्यांना 138 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
झिम्बाब्वेचा दृष्टिकोन सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहणार असला, तरी इंग्लंडचे लक्ष भविष्यावर असेल. या उन्हाळ्यात भारताविऊद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर अॅशेस दौरा आहे. म्हणून झिम्बाब्वेविऊद्धचा सामना तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. विशेषत: स्टुअर्ट ब्रॉड (2023 मध्ये) आणि अँडरसन (गेल्या वर्षी) यांच्या कसोटी निवृत्तीनंतर एका नवीन युगाचा आरंभ करू पाहणाऱ्या गोलंदाजी विभागासाठी तो जास्तच महत्त्वाचा आहे. झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत इंग्लंड सॅम कूकला पदार्पणाची संधी देईल. त्याशिवाय सहकारी वेगवान गोलंदाज जोश टंग दोन वर्षांच्या अनुपस्थितीनंतर संघात परतत आहे आणि गस अॅटकिन्सनही सज्ज झालेला आहे. संघातील एकमेव फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या तंदुऊस्तीबद्दल मात्र अनेक प्रश्न आहेत.









