आयुष शेट्टीही विजयी, पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत पराभूत
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
भारताचे पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय व सतीश करुणाकरन यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार सुरुवात केली, पण ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळविणाऱ्या पीव्ही सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
एचएस प्रणॉयने जपानच्या पाचव्या मानांकित केन्टा निशिमोटोला 19-21, 21-17, 21-16 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभवाचा धक्का दिला. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत जपानच्याच युशी तनाकाशी होईल. सतीश करुणाकरननेही धक्कादायक निकाल नोंदवताना तैपेईच्या तिसऱ्या मानांकित चौ तिएन चेनचा 21-13, 21-14 असा पराभव केला. 39 मिनिटांत त्याने हा सामना संपवला. त्याची पुढील लढत फ्रान्सच्या ख्रिस्तो पोपोव्हशी होईल. भारताचा अन्य एक खेळाडू आयुष शेट्टीनेही दुसरी फेरी गाठली असून त्याने कॅनडाच्या ब्रायन यांगवर 20-22, 21-10, 21-8 अशी मात केली.
नंतर माजी अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांतने आपल्यापेक्षा वरचे मानांकन असणाऱ्या सहाव्या मानांकित चीनच्या लु गुआंग झु याला 23-21, 13-21, 21-11 असे 57 मिनिटांच्या खेळात चकित केले. मात्र महिला एकेरीत पीव्ही सिंधूचा खराब फॉर्म पुढे चालू राहिला. या सुपर 500 स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात तिला अपयश आले. व्हिएतनामच्या एन्ग्युएन थुई लिन्हने तिला 21-11, 14-21, 21-15 असे हरविले.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनीही दुसरी फेरी गाठली असून त्यांनी इंडोनेशियाच्या अदनान मौलाना व इंदाह काह्या सरी जमिल यांच्यावर 21-18, 15-21, 21-14 अशी मात केली. मात्र भारताच्या अन्य सर्व जोड्यांना पराभव स्वीकारावे लागले. अशिथ सूर्या-अमृता प्रमुथेश यांना अग्रमानांकित जियांग झेंग बांग व वेई याशिन यांनी 21-10, 21-12 असे हरविले. रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांनाही चौथ्या मानांकित चीनच्या गुओ झिन वा व चेन फँग हुई यांच्याकडून 10-21, 14-21 असा तर करुणाकरन व आद्या वरियत यांना इंडोनेशियाच्या व्हेरेल युस्तिन मुलिया व लिसा अयू कुसुमावती यांच्याकडून 15-21, 16-21 असास पराभव स्वीकारावा लागला.









