वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या कैलाश-मानसरोवर यात्रेला येत्या जूनपासून प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनाने सज्जता करण्यात प्रारंभ केला आहे. यात्रेसाठी 750 भाविकांची निवड करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर बौद्ध आणि जैन यांच्यासाठीही अतिशय पवित्र आहे.
कैलास पर्वत आणि मानसरोवर ही धार्मिकदृष्ट्या पवित्र स्थाने तिबेटमध्ये आहेत. तिबेटवर चीनचा ताबा असल्याने तेथे जाण्यासाठी चीनची अनुमती आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे चीनकडून अशी अनुमती प्रत्येक वर्षी दिली जाते. याहीवेळी नेहमीप्रमाणे ही यात्रा जूनमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या यात्रेसाठी केवळ मर्यादित संख्येतच भाविकांना अनुमती दिली जात असते.
मंत्र्यांच्या हस्ते निवड
यंदाच्या यात्रेला जाण्याची संधी मिळालेल्या यात्रेकरुंची निवड ‘ड्रॉ’च्या माध्यमातून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आली. निवड प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शी होती. ज्यांनी यात्रेसाठी आवेदनपत्रे सादर केली होती, त्यांना समान संधी देण्यात आली होती. नि:पक्षपातीपणाने निवड करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे.
पाच हजारांहून अधिक अर्ज
यंदा या यात्रेसाठी 4 हजार 24 पुरुष आणि 1,537 महिला अशी 5 हजार 561 आवेदनपत्रे आलेली होती. त्यांच्यापैकी ज्यांची निवड झाली, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही यात्रा यंदा दोन मार्गांनी काढण्यात येणार आहे. प्रथम मार्ग लिपूलेख हा असेल. त्यावर 50 यात्रेकरुंच्या पाच गटांना अनुमती देण्यात आली आहे. तर नाथू ला मार्गावर 50 यात्रेकरुंच्या 10 गटांना अनुमती देण्यात आली आहे. यात्रेकरुंच्या प्रत्येक गटासह दोन संपर्क अधिकारीही नियुक्त करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुविधा आणि सुरक्षा
यात्रेकरुंची सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने सज्जता चालविली आहे. कोणताही अवांछनीय प्रसंग घडू नये, म्हणून शक्य ती सर्व दक्षता घेण्यात येत आहे. केंद्र सरकारने यात्रेकरुंनाही विविध सूचना केल्या असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. यात्रेकरुंना आवश्यकतेनुसार वेळोवेळी विशेष सूचना केल्या जातील, अशीही माहिती देण्यात आली आहे.









