बिहार निवडणुकीसा सर्व घडविले जात असल्याचा दावा
हजारीबाग:
माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा लाभ भाजप उचलत असल्याचा आरोप केला आहे. बिहारची निवडणूक नजीक आली आहे. पुलवामा येथे हल्ला झाला, त्यावेळीही निवडणूक तोंडावर होती, उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला आणि पूर्णपणे लाभ उचलण्यात आला. पुलवामा हल्ल्यानंतरच्या बालाकोट एअर स्ट्राइकच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मते मागितली होती. याचमुळे जे काही घडले आहे, ते पाहता बिहार निवडणुकीवरून हे केले जात असल्याचे मी मानतो. आता तिरंगा यात्रा काढून भाजप स्वत: श्रेय लाटू पाहत असल्याचा वादग्रस्त दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
नरेंद्र मोदींनी कमाल करून दाखविल्याचे भाजपचे लोक आता म्हणू लागले आहेत. पुलवामा हल्ल्यासंबंधी खुलासा आज वर झालेला नाही. अशाचप्रकारे पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधीही कधीच खुलासा होणार नाही. अखेर पहलगाम येथे एकही जवान का तैनात नव्हता? हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले आणि त्यांच्याविषयी कुठलीच माहिती मिळू शकली नाही. अखेर हे दहशतवादी कुठे पसार झाले असा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला. डीजीएमओंना पाकिस्तानी डीजीएमओंनी शस्त्रसंधीकरता फोन केला होता असे सांगण्यात येत आहे. परंतु शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या वक्तव्यापूर्वी भारताने काहीच का सांगितले नाही? याप्रकरणी मोदींनी आतापर्यंत मौन बाळगले असल्याचा दावा सिन्हा यांनी केला आहे.









