ज्योति अन् पाकिस्तानी हँडलरदरम्यान संभाषण
नवी दिल्ली:
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी तुरुंगात असलेली युट्यूबर ज्योति मल्होत्रासंबंधी रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता ज्योति आणि पाकिस्तानी हँडलर यांच्यातील संभाषण समोर आले असून यात ज्योति पाकिस्तानबद्दलचा स्वत:चा ओढा दाखवून देत आहे. यापूर्वी ज्योतिची डायरी पोलिसांच्या हाती लागली होती, ज्यात तिने पाकिस्तानविषयी आणि तेथील लोकांविषयी कौतुकोद्गार काढले होते.
ज्योतिला हिसार पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली होती. ज्योति स्वत:च्या पाकिस्तान दौऱ्यानंतर सातत्याने आयएसआयचा हस्तक अली हसनच्या संपर्कात होती. दोघेही परस्परांमध्ये मोठे संभाषण करत होते. अधिकाऱ्यांना 33 वर्षीय युट्यूबर आणि हसन यांच्यातील चॅट्स हाती लागले आहेत. यात ज्योति माझा विवाह पाकिस्तानातच कुणासोबत करवून द्या असे सांगत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर ज्योतिने हसनसोबतचे संभाषण्हा कोड्सद्वारे केले आहे, या संभाषणाला डिकोड करण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे. याप्रकरणी सातत्याने तपास करणाऱ्या पोलिसांना ज्योतिच्या 4 बँक खात्यांविषयी माहिती मिळाली आहे. यातील एका खात्यात दुबईतून व्यवहार झाले आहेत. तिच्या खात्यांमध्ये पैसे कुठून जमा केले जात होते याचा शोध घेतला जात आहे.
बांगलादेशला जाण्याच्या होती तयारीत
ज्योति मल्होत्रा पाकिस्ताननंतर बांगलादेशला जाण्याची तयारी करत होती. ज्योतिने व्हिसासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. बांगलादेश व्हिसा अर्जात तिने स्वत:चे नाव नमूद केले असून यात तात्पुरता पत्ता म्हणून ढाका येथील उत्तरा अशी नोंद केली आहे. ज्योति व्हिडिओ तयार करण्याच्या नावाखाली बांगलादेशी हस्तकांसोबत संपर्क साधण्याची तयारी करत होती. युट्युबरच्या पाकिस्तान, चीन आणि अन्य देशांमध्ये करण्यात आलेल्या प्रवासाविषयी तपास यंत्रणा माहिती जाणून घेत आहेत.









