धमकीचा मेल आल्याने पोलीस प्रशासन हाय अलर्ट मोडवर
सातारा : सध्या साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देणारा धमकीचा मेल आल्याने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर आले आहे. अचानक अज्ञात व्यक्तीकडून हा मेल आल्याने कार्यालय प्रशासनाची चांगलीच खळबळ उडाली आहे. आज दुपारी सव्वा तीन वाजता सातारा कलेक्टर ऑफिस उडवून देणार असल्याची धमकी अज्ञाताने दिली आहे.
या घटनेमुळे सध्या सातारा शहर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात व्यक्तीने चेन्नईवरून धमकीचा मेल केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बातमीमुळे कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासनास सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यालय रिकामे केले आहे. कार्यालय परिसरातील सर्व दुचाकी,चारचाकी गाड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, बॉम्बेचा शोध घेण्यासाठी बॉम्ब स्कॉड पथक दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. आज सकाळपासून साताऱ्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. भर पावसात बॉम्ब स्कॉड पथकाकडून बॉम्बचे शोधकार्य सुरू आहे. तुर्तास कार्यालयातील प्रवेश बंद केला असून सर्व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेसंदर्भात अजून कोणतीच ठोस माहिती मिळाली नाही.








