रुग्णांना आर्थिक फटका, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव : शहरातील काही हॉस्पिटलमधील ईएसआय सेवा थांबविण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. नागरिकांना हॉस्पिटलमधील ईएसआय सेवा बंद झाल्याची माहिती नसल्याने डिस्चार्जच्यावेळी त्यांना उपचाराची पूर्ण रक्कम भरावी लागत असल्याने रुग्णांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर तक्रार मांडली. तेव्हा त्यांनी आपण ईएसआय हॉस्पिटलला पत्र लिहू असे आश्वासन दिले. शहरात ईएसआय अंतर्गत येणाऱ्या कामगारांची संख्या चार ते पाच लाखांच्या घरात आहे. अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये मर्यादित सेवा उपलब्ध असल्याने ईएसआयधारक व त्यांचे नातेवाईक टायप असलेल्या हॉस्पिटलमध्ये विनाशुल्क उपचार घेत असतात. शहरातील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये यापूर्वी ईएसआयच्या सुविधा मिळत होत्या. त्यामुळे अनगोळ, वडगाव, शहापूर, तसेच ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी वैद्यकीय उपचार घेत होते.
परंतु मागील काही दिवसापासून याठिकाणची ईएसआय सेवा खंडित करण्यात आली आहे. याठिकाणी उपचार घेत असलेल्या नागरिकांनी डिस्चार्जवेळी ईएसआय सुविधा असल्याचे सांगितले असता सध्या चॅरिटेबल हॉस्पिटल ईएसआयशी टायप नसून तुम्ही पूर्ण बिल भरून ते ईएसआयकडून रिफंड करून घेण्याची सूचना करण्यात आली. सर्वसामान्यांकडे उपचाराची पूर्ण रक्कम भरणे अशक्य असल्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधला. गुंजटकर व रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. काही वेळानंतर ईएसआयच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविले. त्यावेळी त्यांनी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ईएसआय सेवा थांबविण्यात आल्याचे सांगितले. केवळ ट्रस्ट संचलित सेवा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आपण वरिष्ठ ईएसआय अधिकारी व केएलई प्रशासनाशी पत्रव्यवहार करू, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, अभिषेक भोसले व इतर उपस्थित होते.









