पाकव्याप्त काश्मीरमधील लीपा तळ पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याची सेनाधिकाऱ्यांची माहिती, हा मोठा हादरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात चालविलेल्या ‘सिंदूर’ अभियानात पाकव्याप्त काश्मीरमधील लीपा खोऱ्यातील पाकिस्तान सेनेचा तळ पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. हा तळ पुन्हा निर्माण करण्यासाठी पाकिस्तानला किमान 1 वर्षभराचा कालावधी लागेल, असे भारताच्या सेनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या तळावरील किमान 3 चौक्या, दारुगोळ्याचे भांडार, इंधन साठवणूक सुविधा आणि शस्त्रास्त्रे यांचा पूर्णपणे विनाश करण्यात आला आहे. तसेच इतरही सर्व सुविधा नष्ट करण्यात भारताला यश आले आहे.
पाकिस्तानने भारताच्या विरोधात अवजड शस्त्रे उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच अधिक उंचीवर मचाण बांधून त्यावरुन भारताच्या भागात मारा करण्याचा प्रयत्न केला. तथापि, हे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताची कोणतीही हानी या भागात झालेली नाही. तसेच पाकिस्तानचे इतर तळही नष्ट करण्याची कामगिरी भारताने केली, असे स्पष्ट केले गेले आहे.
‘आकाशदीप’ची देदिप्यमान कामगिरी
‘आकाशदीप’ या स्वदेश निर्मित रडार यंत्रणेने या संघर्षात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या रडारचा अतिशय उपयोग भारतीय सैन्याला झाला असून या रडार यंत्रणेने पाकिस्तानने सोडलेल्या प्रत्येक क्षेपणास्त्राचा आणि ड्रोनचा अचूक वेध घेऊन ही सर्व शस्त्रे नष्ट करण्यात महत्त्वाचे कार्य केले आहे. यामुळे भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास दुणावला आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.
पाकिस्तानचे 64 सैनिक ठार
विविध सूत्रांनी दिलेल्या विश्वसनीय सूत्रांच्या अनुसार भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे किमान 64 सैनिक ठार झाले असून 96 सैनिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेक पाकिस्तानी सैनिकांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे मृत सैनिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी केवळ भारताच्या ‘चिनार’ तुकडीने केलेल्या पराक्रमाची आहे. यावरुन एकंदर अभियानात पाकिस्तानची किती मोठी हानी झाली असेल, याचे अनुमान काढता येते. हा दणका पुढचा बराच काळ त्यांच्या लक्षात राहणार आहे, अशी माहिती दिली गेली.
प्रहारांचे प्रमाण एकाला तीन
पाकिस्तानच्या एका हल्ल्याला भारताचे तीन प्रतिहल्ले असे प्रमाण चिनार तुकडीने ठेवले होते. त्यामुळे पाकिस्तानची हानी भारताच्या किमान 20 पट झाली असल्याचे तज्ञांचे अनुमान आहे. भारताची स्थिती काश्मीर सीमेवर या अभियानात अत्यंत भक्कम राहिली. स्वत:ची कमीत कमी हानी होऊ देऊन शत्रूची मात्र प्रचंड हानी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत, या केवळ चार दिवसांच्या संघर्षात भारताने पाकिस्तानला प्रचंड मोठा धडा शिकविला असून सामर्थ्य सिद्ध केले आहे, असेही सेनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानी सैन्याची पळापळ
भारताच्या चिनार तुकडीने केलेले हल्ले इतके भेदक आणि परिणामकारक होते, की त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैनिकांची पळापळ होत असल्याचे दिसून येत होते. भारताची हानी करण्याचा विचार त्यांना भारताच्या प्रतिहल्ल्यानंतर सोडून द्यावा लागला होता. तसेच केवळ स्वत:चा बचाव करण्याचाच प्रयत्न त्यांना करावा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक पाकिस्तानी सैनिक लीपा येथील तळावरुन पळून गेल्याचे दिसून येत आहे. या उद्ध्वस्त तळाची उपग्रहीय छायाचित्रेही भारताने केलेल्या हानीला दुजोरा देत आहेत. आपला पराक्रम या तुकडीने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.









