पंजाबच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे समर्थनप्राप्त खलिस्तानी दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत पोलिसांनी बब्बर खालसा इंटरनॅशनल मॉड्यूलला ध्वस्त केले आहे. हे मॉड्यूल हरविंदर सिंह रिंडाच्या निर्देशावर मनिंदर बिल्ला आणि मन्नू अगवानच्या नेतृत्वात काम करत होते. पोलिसांनी चकमकीनंतर मॉड्यूलच्या 6 सदस्यांना पकडल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी जतिन कुमार उर्फ रोहन, बरिंदर सिंह उर्फ साजन, राहुल मसीह, अब्राहम उर्फ रोहित, सोहित आणि सुनील कुमार या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी दहशतवादी नेटवर्कच्या वेगवेगळ्या सब- मॉड्यूलचा हिस्सा होते. त्यांच्याकडे ग्रेनेड ऑपरेट, लॉजिस्टिक सपोर्ट, फायनान्शियल हँडलर्स आणि आश्रय देण्याचे काम होते. या मॉड्यूलने बटाला येथे एका मद्यविक्री दुकानाबाहेर ग्रेनेड हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
हल्ल्यानंतर दहशतवादी मन्नू अगवानने याची जबाबदारी स्वीकारली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोर्तुगाल येथील मनिंदर बिल्ला आणि बीकेआयचा सूत्रधार मन्नू अगवानकडून थेट निर्देश मिळत होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुहैल कासिम मीर यांनी दिली.









