बेळगाव : महसूल वाढीसाठी राज्य सरकारने सेना दलाच्या कँटीनना केल्या जाणाऱ्या मद्य व बियर पुरवठ्यावरही अतिरिक्त अबकारी कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे मिलिटरी कँटीनमध्येही मद्य महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कर्नाटकात सध्या 62 मिलिटरी कँटीन आहेत. या कँटीनमध्ये सध्या सेवेत असलेल्या व निवृत्त जवानांना कमी किमतीत मद्यपुरवठा केला जातो. कँटीनसाठी पुरवण्यात येणाऱ्या मद्य व बियरवरही कर वाढवून महसूल वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. करवाढ लागू झाल्यास मिलिटरी कँटीनमध्येही मद्य व बियरचे दर वाढणार आहेत. केंद्रीय संरक्षण विभागाकडून सीएसडी कँटीन चालविले जातात. देशात 3 हजार 700 हून अधिक मिलिटरी कँटीन आहेत. लष्करी जवान, निवृत्त जवान व त्यांच्या कुटुंबीयांना कमी किमतीत आवश्यक वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व गृहोपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. कर सवलतीमुळे या वस्तूंचा दरही कमी असतो.
सामान्य मद्य दुकानांच्या तुलनेत कँटीनमध्ये 30 ते 40 टक्के कमी किमतीत मद्य उपलब्ध होते. अबकारी विभागाकडूनच कँटीनना मद्यपुरवठा होतो. डिस्टीलरीतून मिलिटरी वायनरीच्या माध्यमातून कँटीनना पुरवठा होतो. अबकारी कायद्यांतर्गत मिलिटरी कँटीनना केल्या जाणाऱ्या मद्यपुरवठ्यात अल्प प्रमाणात कर असतो. नव्या स्लॅबनुसार प्रतिलिटरला 1 रुपये ते 3 रुपये 70 पैसे कर वाढ करण्याचा व बियरला प्रतिलिटर 2 रुपये कर आहे. महसूल वाढीसाठी अबकारी विभागाने यापूर्वी 2 ते 3 वेळा दरवाढ केली आहे. आता आर्मी कँटीनसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या मद्य व बियरवरही करवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी केली आहे. शेजारच्या राज्यातील आर्मी कँटीनना पुरवठा होणाऱ्या मद्यावरील कर किती आहे, याचा अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
करवाढीनंतर महसूल वाढणार
सध्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, केरळ, गोवामध्ये मिलिटरी कँटीनना पुरवठा केल्या जाणाऱ्या मद्यावर सध्या अधिक कर आहे. याच धर्तीवर कर्नाटकातही करवाढ होणार आहे. करवाढीनंतर महसूल वाढ होण्यास याची मदत होणार आहे, असे अबकारी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.









