पालकमंत्री सतीश जारकीहोळी : सुळेभावीत शिवाजी महाराजांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांची समाधी असलेल्या चन्नगेरी तालुक्यातील होदिगेरे गावात भव्य स्मारक उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री डॉ. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सुळेभावी गावात रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नूतन पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात उद्घाटन करून ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि तत्त्वांचा अवलंब करून वाटचाल केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून सर्वांनी चालले पाहिजे, सुळेभावी गावात जात, धर्म, भेदभाव नाही ही अभिमानाची बाब आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष, आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.
सुळेभावी गावातील ही एक ऐतिहासिक घटना असून आकर्षक स्मारक पाहून समाधान वाटते. त्याचबरोबर बुद्ध, बसवाण्णा, आंबेडकर हे सर्वांसाठी आदर्श होत, असे पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे विकासाबरोबरच सामाजिक कार्य करत आहेत. आजचा हा दिवस ऐतिहासिक आहे. कारण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी अनेकांची मागणी होती. ती मागणी मंत्री हेब्बाळकर आणि विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी पूर्ण केली आहे. मंत्री हेब्बाळकरांनी स्वत:च्या पैशातून पुतळा उभारला आहे. काँग्रेस सरकार सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असून गृहलक्ष्मीच्या पैशामुळे गरीब मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासह अनेक कामांना मदत होत आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, पुतळ्याची प्रतिष्ठापना राजकारणासाठी किंवा जनतेला खूष करण्यासाठी नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा संघर्ष आपल्या मुलांना प्रेरणादायी ठरावा, तसेच या देशाची संस्कृती टिकावी, यासाठी या पुतळ्याची प्रतिष्ठापना करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम श्रीशैल स्वामीजी यांच्या सानिध्यात पार पडला. यावेळी बसनगौडा पाटील, नागेश देसाई, शंकरगौडा पाटील, बसवराज मॅगोट्टी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









