सलग दुसऱ्यांदा पटकावले जेतेपद, बांगलादेशवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 गोलफरकाने मात
वृत्तसंस्था/ युपिया, अरुणाचल प्रदेश
अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या सॅफ यू-19 चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत भारताच्या युवा फुटबॉल संघाने बांगलादेश संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. मागील वर्षीही भारतानेच जेतेपद मिळविले होते.
निर्धारित वेळेत दोन्ही संघांत 1-1 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर अटीतटीच्या ठरलेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने एका गोलाच्या फरकाने निसटती बाजी मारली. स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर भारताने दुसऱ्याच मिनिटाला बांगलादेशवर आघाडी घेतली. कर्णधार सिंगामयुम शमीने हा गोल नोंदवला. त्यानंतर 61 व्या मिनिटाला मोहम्मद जॉय अहमदने गोल नोंदवून बांगलादेशला बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेतील बरोबरीनंतर शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.
भारताच्या रोहेन सिंगने मारलेली पेनल्टी कीपर इस्माईल हुसेन महिनने वाचवल्याने बांगलादेशची बाजू वरचढ झाली. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुडा फैजलने मारलेला फटका क्रॉरबारच्या वरून गेल्यानंतर भारताची बाजू पुन्हा वरचढ ठरली. विश्वास वाढल्याने भारतीय खेळाडूंनी उर्वरित पेनल्टीवर अचूक गोल नोंदवले तर भारतीय गोलरक्षक सूरज सिंग अहीबमने अप्रतिम कामगिरी करीत बांगलादेशच्या सलाहुद्दिन साहेदचा फटका डावीकडे झेपावत अचूक अडवला. कर्णधार सिंगामयुम शमीने शेवटच्या पेनल्टीवर शांतपणे फटका मारत अचूक गोल नोंदवला आणि भारतीयांचा जल्लोष सुरू झाला.
अटीतटीचा झालेल्या या सामन्याच्या शेवटही रोमांचक झाला. मिठू चौधरी, मुर्सीद अली व जॉय अहमद यांनी पेनल्टीवर बांगलादेशचे गोल नोंदवले तर अरबाश, रिषी सिंग, जॉडरिक अब्रांचेस व शमी यांनी भारताचे गोल केले.









