पाकसमर्थक घालत होते गोंधळ
लिस्बन :
पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये भारतीय दूतावासानजीक गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानींना भारताच्या अधिकाऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दूतावासाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ एक बॅनर झळकवत पाकिस्तान समर्थकांचे तोंड बंद केले. या बॅनरवर ‘ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही’ असा मजकूर होता.
काही पाकिस्तानी नागरिक लिस्बनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर जमले होते. या पाकिस्तानी नागरिकांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. यानंतर भारतीय दूतावासाने कठोर प्रतिक्रिया देत पाकिस्तानींचे कृत्य निराशाजनक आणि चिथावणीपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
दूतावासाने दिला संदेश
भारतीय दूतावासाने एक्सवर छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये दूतावासाच्या इमारतीवर झळकलेला बॅनर दिसून येतो. या बॅनरवर ‘ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही’ असे नमूद होते. या बॅनरखाली दूतावासाचे कर्मचारी आणि अधिकारी उभे आहेत. पोर्तुगालमध्ये चांसरी भवनानजीक पाकिस्तानकडून आयोजित भ्याड निदर्शनांना दृढपणे प्रत्युत्तर दिले. आम्ही पोर्तुगाल सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांना दूतावासाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात सहकार्य करत आहोत. भारत अशा हताशाजनक चिथावणीला घाबरणार नाही असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.









