राजापूर :
तालुक्यात फार्मर युनिक आयडी काढणेकरीता ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, तलाठी यांच्यामार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधून जनजागृती केली जात आहे. त्याला शेतकऱ्याकडून थंडा प्रतिसाद मिळताना तालुक्यातील सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. त्यामुळे फार्मर युनिक आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे.
शासनाच्या पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने अॅग्री स्टॅक प्रोग्रॅम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करीत फार्मर युनिक आयडी काढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना आधारकार्डप्रमाणे त्याच्या शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून देणारा फार्मर युनिक आयडी देण्यात येणार आहे. या आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांची माहिती एकत्र संकलित होणार आहे. जेणेकरून त्या माहितीच्या आधारे शासनाला कृषी विषयक धोरण वा योजना राबविणे अधिक सुलभ होणार आहे. या व्यतिरीक्त फार्मर युनिक आयडीमुळे शेतककऱ्यांना पिकानुसार किसान क्रेडीट कर्ज, पिकांबाबत सल्ला, हवामानाबाबत माहिती व सल्ला, आपत्ती सल्ला व प्रतिसाद, बाजारभावाबाबत सल्ला, कीड व इतर रोगांबाबत सल्ला, कीटकनाशक वापरण्याबाबत सल्ला, मृदा आरोगय माहिती यांसारखी शेतीपूरक माहिती उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने अॅग्री स्टैंक प्रोग्रॅम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अन्यया, शेतकऱ्यांना पीएम किसान, पीक विमा आणि अन्य कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर युनिक आयडी महत्वपूर्ण असले तरी, फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी तालुक्यामध्ये थंडा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
तालुक्यामध्ये फार्मर युनिक आयडी काढण्यासाठी ६४ हजार ११८ शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यापैकी १८ हजार १६४ शेतकऱ्यांनी सद्यस्थितीमध्ये फार्मर युनिक आयडी काढले असून अद्यापही ४५ हजार ९५४ शेतकऱ्यानी फार्मर आयडी काढलेले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. फार्मर युनिक आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्याशी संवाद साधला जात आहे. जनजागृती केली जात आहे. त्यानंतरही, फार्मर आयडी काढण्याचे शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे.








