उंडाळे :
रखरखत्या उन्हात डोक्यावरील पाटी, त्यात रानमेवा घेऊन ग्रामीण भागात गावोगावी व शहरात फिरून ‘जांभळे घ्या जांभळं. करवंद घ्या करवंद… अशा आरोळ्या देत रानमेवा विक्रीसाठी डोंगरी विभागातील महिला व पुरुष कराडसह तालुक्यात भटकंती करताना दिसत आहेत.
मे महिना उजाडला, की जांभळं, करवंद, आळू तोरणं, डोरलं यासह विविध प्रकारचा रानमेवा बहरत असतो. शहरात अशा रानमेव्याची फारशी झाडे पाहायला मिळत नाहीत. चांदोलीसह परिसरात मात्र हा रानमेवा भरभरून येतो. चांदोली परिसरात सह्याद्रीच्या कणाकपारीत अनेक धनगरवाडे व वाक्या-वस्त्या वसलेल्या आहेत. या बाड्या आजही सोयी-सुविधांपासून वचित आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अनेक पुरुष मंडळी मुंबईसह शहराकडे रोजंदारी करतात. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक गावाकडे राहतात. शेळ्या-मेंढ्या जनावरे पाळणे, सरपण गोळा करणे, रानमेवा आला, की तो बाजारात नेऊन विकणे, त्यातून मिळणाऱ्या पैशातून घराला लागणाऱ्या तेल, चटणी, मिठाची खरेदी करणे हा त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो.
सध्या चांदोलीसह परिसरातील अनेक धनगरबांधव हा रानमेवा घेऊन कराडसह तालुक्यातील अनेक गावांत चांदोली परिसरातून जिल्ह्याच्या विविध शहरांत रानमेवा विकण्यासाठी निघालेले दिसतात. भर उन्हात जांभळे विक्री करत, ग्राहकांना खरेदी करण्याचा आग्रह करताना दिसतात. ग्राहकही ‘आणखी चार जांभळं घाला की’ असा आग्रह करत रानमेवा खरेदी करताना दिसतात. रानमेव्याला आयुर्वेदिक परंपरा असल्याने लोकांनाही रानमेव्याचे महत्त्व पटलेले दिसते. त्यामुळे लोकही रानमेवा खरेदी करून त्याचा आस्वाद घेताना दिसतात. इस्लामपूर, सांगली, मिरज, आष्टा शहरात भटकंती करून रानमेवा विकला जात आहे. पहाटे पाचपासून या धनगर बांधवांचा दिनक्रम सुरू होतो.
- दिवसभरात १५ ते २० किलोमीटरची पायपीट
रानमेवा विक्री करून संध्याकाळी घरी पोहोयायला अकरा-बारा वाजतात. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता उठून पुन्हा सकाळपासून हाच दिनक्रम. दिवसाकाठी पंधरा-वीस किलोमीटरची पायपीट होते. विक्री करताना तहान लागली की पाणी मागून पिणे, कुणी माजी-भाकरी किंवा शिळंपाकं दिलं तरी, त्याचा आनंदाने स्वीकार करतात. जाताना त्यांच्या ताटात समाधानाने मूठभर रानमेवा ठेवतो, असे रानमेवा विक्रेते सांगतात.
- दिवसाकाठी घार-पाचशे रुपये मिळतात…
दिवसभरात चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करतो. त्यात पंधरा-वीस किलोमीटरची पायपीट. दिवसाकाठी चार-पाचशे रुपये मिळतात. वाक्यावरचे स्त्री-पुरुष सोबत निघतात. पुढे प्रत्येकजण वेगवेगळ्या गावात जातात. पुन्हा संध्याकाळी सर्व जण एकत्र येऊन बाड्यावर पोहोचतो. रानमेव्यामुळे महिना, दोन महिने का होईना, पोटभर खायला मिळते. त्यामुळे भटकंतीचा त्रास जाणवत नाही.
– जनाबाई डफडे, राबूचा धनगरवाडा








