पाटण :
थकीत मालमत्ता करासह थकीत वसुलीसाठी पाटण नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून वसुलीसाठी वडक मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार मागणी करून देखील कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. दरम्यान, जाणूनबुजून थकीत कर न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. मोरे यांनी केले आहे
पाटण शहरातील मालमत्ता कराची येणे बाकी १३७.५६ लाख इतकी असून त्यातील ५२.७८ लाख इतक्या मालमत्ता कराची वसुली झाली आहे. ही वसुली ३८ टक्के आहे. पाणीपट्टी कराची मागणी ८२.५१ लाख इतकी असून २८.१६ लाख इतकी पाणीपट्टी वसुली झाली आहे. ही वसुली ३४.०९ टक्के आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात शहरातील थकीत मालमता कर व पाणीपट्टी कर वसुली बाकी आहे. त्यामुळे पाटण नगरपंचायत प्रशासनाकडून वसुली मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे. कर थकबाकीदारांच्या दारात वाजत गाजत जाऊन कर भरण्याबाबत आवाहन केले जात आहे.
मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीसाठी दोन पथके कार्यरत आहेत. प्रत्येक प्रभागात जाऊन ही करवसुली केली जात आहे. थकीत असणाऱ्याचे नळकनेक्शन तोडले जात आहेत. आतापर्यंत जवळपास ५४ नळकनेक्शन तोडली आहेत.
या धडक मोहिमेमुळे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अनेकांनी कारवाईची धास्ती घेतली आहे. काही थकबाकीदारांनी थकबाकी भरली आहे. मात्र अद्यापही काही मिळकतधारक कर भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. त्यांच्या वसुलीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके मिळकतधारकांच्या घरोघरी जाऊन कराची मागणी करत आहेत. जे मिळकतधारक कर भरत नाहीत, अशा थकीत मिळकतधारकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
वारंवार मागणी करूनही नगरपंचायतीचा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकावर प्रसिद्ध केली आहेत. तरीही थकबाकी न भरणाऱ्यांवर यापुढे नगरपंचायतीच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.








