साई सुदर्शनचे नाबाद शतक, शुभमनचीही दणकेबाज खेळी : दिल्लीचा 10 गडी राखून पराभव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने दिल्लीचा 10 गडी राखून पराभव केला. गुजरातने एकही विकेट न गमावता हा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातचा संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरला. या विजयासह गुजरातने आरसीबी व पंजाब या दोन संघांनाही प्लेऑफमध्ये नेले आहे. प्रारंभी, केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 199 धावा केल्या. यानंतर गुजरातने मात्र विजयी लक्ष्य 19 षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले.
दिल्लीने विजयासाठी दिलेले 200 धावांचे टार्गेट साई सुदर्शन व केएल राहुल यांनी शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. साई सुदर्शन आणि शुभमन गिलने 205 धावांची भागीदारी केली. यामध्ये साई सुदर्शनने नाबाद शतकी खेळी साकारताना दिल्लीच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. त्याने 62 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 177 च्या स्ट्राईक रेटने 108 धावांचे योगदान दिले. कर्णधार शुभमन गिलने 53 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह 93 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या जोडीने विजयी लक्ष्य 19 षटकांतच पूर्ण करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

केएल राहुलचे शतक वाया
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीला पहिला धक्का डु प्लेसिसच्या रूपात बसला. 5 धावा काढून तो आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, दोन्ही फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, परंतु त्यानंतर साई किशोरने अभिषेक पोरेलच्या रूपात दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. अभिषेक पोरेल 30 धावा काढून आऊट झाला. यानंतर, अक्षर पटेलने 25 धावांची खेळी खेळली, पण प्रसिद्ध कृष्णाने त्याची शिकार केली. केएल राहुल मात्र शेवटपर्यंत राहिला आणि शानदार शतक झळकावून नाबाद परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने 21 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने 65 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले. केएल राहुलचे आयपीएलमधील हे पाचवे शतक आहे.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 3 बाद 199 (केएल राहुल 65 चेंडूत नाबाद 112, अभिषेक पोरेल 30, अक्षर पटेल 25, स्टब्ज नाबाद 21, अर्शद खान, प्रसिद्ध कृष्णा व साई किशोर प्रत्येकी एक बळी)
गुजरात टायटन्स 19 षटकांत बिनबाद 205 (साई सुदर्शन 61 चेंडूत 12 चौकार व 4 षटकारासह नाबाद 108, शुभमन गिल नाबाद 53 चेंडूत 3 चौकार व 7 षटकारासह नाबाद 93).
गुजरात, आरसीबी, पंजाब प्लेऑफमध्ये
गुजरात टायटन्सने हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयाचा फायदा आरसीबी व पंजाब संघांना झाला. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनीही प्लेऑफसाठी पात्र झाले. गुजरातचा संघ आता 12 सामन्यांनंतर 18 गुणांसह टॉपवर आहे. दुसरीकडे, आरसीबी या हंगामात 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचेही 17 गुण आहेत. याचा अर्थ असा की आता या संघांमध्ये टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहे.









