हवामान विभाग : 1 ते 2 जूनपर्यंत मोसमी पाऊस सक्रिय होणे अपेक्षित
पुणे :
नैऋत्य मोसमी वारे वेगाने भारतीय भूमीकडे येत असून, केरळमध्ये 27 मे दरम्यान, तर तळकोकण, पुणे, मुंबई शहरात नियोजित तारखेच्या आधीच मान्सून येण्याचा अंदाज हवामानतज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी शनिवारी वर्तविला. महाराष्ट्रात 1-2 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, अंदमान समुद्र व्यापत मान्सूनने शनिवारी मालदीव आणि कोमोरून बेटे काबीज केली. श्रीलंकेचा बराच भाग मान्सूनने व्यापला आहे. येत्या 4-5 दिवसात मान्सून मालदीव, कोमोरूनचा उर्वरित भाग, दक्षिण अरबी समुद्र, दक्षिण बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.








