प्रतिनिधी/ बेळगाव
राजस्थान प्रिमियर लिग या क्रिकेट संघात निवड करण्याचे सांगून बेळगाव जिल्ह्यातील तरुणाला तब्बल 24 लाख रुपयांना गंडा घातला आहे. सायबर गुन्हेगारांच्या करामतीने खेळाडू व क्रिकेटप्रेमींमध्ये एकच खळबळ माजली आहे.
चिंचणी, ता. चिकोडी येथील एका तरुणाची फसवणूक झाली आहे. जिल्हा सायबर क्राईम विभागात त्याने तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. गेल्या 22 नोव्हेंबर ते 19 एप्रिल 2025 या काळात एकूण 23 लाख 53 हजारांहून अधिक रक्कम सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
चिंचणी येथील एक तरुण गेल्या वर्षी मे मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तेथे त्याने उत्तम खेळ केल्याने याच वेळी ‘सुशांत-श्रीवास्तव1’ या नावे इन्स्टाग्रामवर खाते असणाऱ्याशी ओळख झाली. आपण निवड समितीत आहोत. राजस्थान प्रिमियर लिग संघात तुझी निवड केली जाईल, असा त्या तरुणाला विश्वास दिला. राजस्थान संघात निवड झाल्यानंतर प्रत्येक सामन्याला 40 हजार रुपये व प्लेयर फी म्हणून 8 लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या भामट्यांवर विश्वास ठेवून तरुणाने केवळ आपल्या बँक खात्यातून नव्हे तर नातेवाईक व मित्रांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जमा केली.
ऑनलाईनच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा करून घेतल्यानंतर राजस्थान प्रिमियर लिग क्रिकेट संघात त्याची निवड तर झाली नाही उलट त्याच्याकडून घेतले पैसेही परत करण्यात आले नाहीत. आपण फसलो गेलो, हे लक्षात येताच त्या तरुणाने सायबर क्राईम पोलीस स्थानक गाठले व संबंधिताविरुद्ध फिर्याद दिली आहे.









