जमखंडी येथील धक्कादायक घटना
जमखंडी :
येथे एका लग्न मंडपातील बोहल्यावरील नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जमखंडीत शनिवारी दुपारी घडली. पवन कुरणे (वय 25) असे मृत नवरदेवाचे नाव आहे. सदर लग्नकार्य येथील श्री नंदिकेश्वर कल्याण मंडपात आयोजित करण्यात आले होते. पवन हा प्रसिद्ध माजी सायकलपटू श्रीशैल कुरणे यांचा मुलगा आहे.
शनिवारी सकाळपासून विवाह समारंभाची तयारी जोमाने करण्यात आली होती. पै-पाहुणे व आमंत्रितांनी मंडप भरला होता. अक्षतारोपण झाले, वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातल्या. नवरदेवाने नववधूला मंगळसूत्र बांधले. काहीजण वधू-वरांना आशीर्वाद देण्यास पुढे आले. त्याचक्षणी नवरदेव खाली कोसळले ते कायमचे. पवन याला तीव्र हृदयविकाराचा धक्का बसल्याचे समजते.
उपस्थितांनी लागलीच नवरदेवाला नजीकच्या दवाखान्यात हलविले. पण बोहल्यावरच त्याने प्राण सोडला होता, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मंगलमय वातावरण क्षणार्धात सुतकात बदलले. सजविलेल्या वाहनातून घराकडे वधूसह परतणाऱ्या नवरदेवाला शववाहिकेतून स्मशानभूमीकडे घेऊन जाण्याचा प्रसंग ओढवल्याने नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलावून सोडत होता. नववधूचे मांगल्य केवळ काही क्षणात पुसले गेले. त्यामुळे उपस्थितांतून हळहळ व्यक्त होत आहे.









