पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ, जमिनीत पुरेसा ओलावा, शेतीकामात बळीराजा मग्न
बेळगाव : मागील चार दिवसापासून झालेल्या दमदार वळीव पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत केली जात आहे. विशेषत: माळरानावर जनावरांना चाऱ्यासाठी मका, बाजरी आणि ज्वारीची पेरणी केली जात आहे. एप्रिल पंधरवड्यानंतर वळीव पावसाने पाठ फिरविली होती. मात्र आता काही प्रमाणात वळीव पाऊस झाल्याने शेतीकामांना प्रारंभ झाला आहे. विशेषत: बेळगाव तालुक्यात भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, मका आदी बियाण्यांची पेरणी केली जाते. या पार्श्वभूमीवर मशागतीच्या कामांना चालना मिळाली आहे. तालुक्यात 50 हजारहून अधिक हेक्टरात पेरणी करण्याचा अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरविली जाणार आहेत. रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये बियाणे उपलब्ध केली जात आहेत.
धूळवाफ पेरणीसाठी धडपड
गतवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पाण्याच्या टंचाईबराब्sार चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. यासाठी यंदा वळीव पावसानंतर जनावरांच्या ओल्या चाऱ्यासाठी मका आणि इतर बियाण्यांची पेरणी केली जाते. मे अखेरीस धूळवाफ पेरणीला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी मशागतीची कामे पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेती क्षेत्रामध्ये मशागतीबरोबर बांध घालणे, शेणखत टाकणे आणि इतर कामेही केली जात आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पेरणीचा मुहूर्त साधण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे बैलजोडी ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांची शिवारात धांदल दिसत आहे.









