माजी कायदा मंत्री माधुस्वामी यांची उपस्थिती : राज्यस्तरीय कायदा विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन
बेळगाव : देश आणि राज्यातील अलीकडच्या प्रकरणांकडे पाहताना न्यायपालिका, प्रशासकीय आणि कायदे मंडळाच्या व्याप्तीमध्ये गोंधळ असणे दुर्दैवी आहे. कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजातील गरीब, श्रीमंत, उच्च, निच यांच्यातील दरी समजून घेऊन ग्रामीण भागातील लोकांमध्ये कायद्याबाबत जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी माहिती माजी कायदा मंत्री माधुस्वामी यांनी दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे शहरातील कन्नड भवन येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कायदा विद्यार्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. बसवराज, गुलबर्गा विद्यापीठाच्या कायदा विभागाचे प्रमुख डॉ. बसवराज कुबकड्डी, अभाविपचे राज्य सचिव सचिन कुलगेरी, राज्याध्यक्ष डॉ. आनंद होसूर यासह इतर उपस्थित होते.
नवनवीन गोष्टींचे अध्ययन केल्यास ज्ञानात भर
माधुस्वामी पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी समाजामध्ये अशी ओळख निर्माण करावी की, न्यायासाठी लोकांनी त्यांच्याकडे आले पाहिजे. दररोज चालू घडामोडींबद्दल अभ्यास केल्यास नवनवीन गोष्टींचे अध्ययन केल्यास ज्ञानात भर पडेल, असे ते म्हणाले. डॉ. बसवराज म्हणाले, 75 वर्षे होत आली तरी बलात्कार, भ्रष्टाचार, भेदभाव हे नष्ट करणे शक्य झालेले नाही. हे दूर करण्याची मोठी जबाबदारी कायद्याच्या विद्यार्थ्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचे संविधान सर्वात महान
डॉ. बसवराज कुबकड्डी यांनी देशात संविधान श्रेष्ठ असल्याचे सागितले. रोहित उमनाबादीमठ यांनी स्वागत केले. यावेळी कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









