कोल्हापूर :
मित्राकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षीत तरुणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आकाश शांताराम बोराडे (वय 23 रा. आर. के. नगर, मुळ रा. कतराबाद, परांदा जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नांव आहे. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आकाश बोराडे याने आत्महत्येपूर्वी चारपानांची सुसाईड नोट लिहली असून यावरुन आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. दरम्यान या प्रकरणी त्या मित्रावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळचा धाराशिव येथील आकाश बोराडे हा केआयटी महाविद्यालयामध्ये एमबीएच्या अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत होता. नुकतीच त्याने अंतिम वर्षाची शेवटची परिक्षा दिली होती. एका मॉलमध्ये त्याची डिपार्टमेंट व्यवस्थापक म्हणून नेमणूकही झाली होती. मात्र काही दिवसांपासून आकाश ताण तणावामध्ये वावरत होता. त्याने याचे कारण नातेवाईकांनाही सांगितले होते. गुरुवारी रात्री अखेर त्याने आर.के.नगर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहा शेजारी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना चार पानाची सुसाईड नोट आढळून आली. यावरुन आकाशच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला. त्याला एका मित्राकडून वारंवार मानसिक त्रास सुरु होता. यालाच कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन आकाशचा मृतदेह मुळ गावी नेण्यात आला. अंतिम संस्कार झाल्यानंतर त्याचे नातेवाईक तक्रार देणार असून यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.








