शिखरावरून उतरताना हिलरी स्टेप्सवर दुर्घटना
वृत्तसंस्था/ काठमांडू
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट शिखरावर एका भारतीय गिर्यारोहकासह दोघांचा मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय भारतीय गिर्यारोहक सुब्रत घोष हा तिरंगा फडकवल्यानंतर एव्हरेस्टवरून खाली उतरत असताना त्याला आपला जीव गमवावा लागला. सुब्रत घोष हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. नेपाळ पर्यटन विभागाच्या मते, या हंगामात माउंट एव्हरेस्ट चढाई सुरू झाल्यापासून मृत्यूची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 45 वर्षीय फिलिपिनो गिर्यारोहक फिलिप सॅंटियागो यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला होता. फिलिप एव्हरेस्टच्या शिखरावर चढत असताना चौथ्या छावणीत पोहोचेपर्यंत तो खूप थकला होता. विश्रांतीसाठी थांबला असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.
नेपाळच्या स्नोई होरायझन ट्रेक्स अँड एक्सपिडिशनचे व्यवस्थापकीय संचालक बोधराज भंडारी यांनी या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. सुब्रत घोष हा गिर्यारोहक 8,848 मीटर उंचीच्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वीरित्या पोहोचला होता. त्यानंतर शिखरावरून खाली उतरत असताना अचानक हिलरी स्टेपवर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हिलरी स्टेप हे माउंट एव्हरेस्टच्या शिखरासमीप असून त्याला ‘डेथ झोन’ देखील म्हणतात. माउंट एव्हरेस्टवर 8,000 मीटर (26,250 फूट) उंचीवर असलेले हिलरी स्टेप हे साउथ कोल आणि शिखर यांच्यामधील बिंदू आहे. येथे नैसर्गिक ऑक्सिजन खूपच कमी असल्यामुळे श्वास घेणे कठीण होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सुब्रत घोष आपल्या मार्गदर्शकासह एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचला. पण उंची गाठल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. हिलरी स्टेपवर पोहोचल्यानंतर त्याने खाली उतरण्यास नकार दिला. त्यानंतर हिलरी स्टेपवरून उतरत असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुब्रतचा मृतदेह बेस कॅम्पवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भंडारी म्हणाले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.









