मॅजिक स्पोर्ट्स क्लब आयोजित : रेग एफसीचा टायब्रेकरवर केला पराभव, प्रणीत सप्ले उत्कृष्ट खेळाडू,पास्कल उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : मॅजिक स्पोर्ट्स क्लब व अमोदराज स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमोदराज चषक 15 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीयूएफसीने रेग एफसीचा टायब्रेकरमध्ये 5-4 अशा गोलफरकाने पराभव करुन अमोदराज चषक पटकाविला. प्रणीत सप्ले उत्कृष्ट खेळाडू तर पास्कलला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. सेंट पॉल स्कूलच्या अॅस्ट्रोटर्फ मैदानावरती स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून टेल्कोग्रुपचे टी. एस. सत्यनारायण, जितेंद्र पुरोहित, अमोदराज स्पोर्ट्सचे जितेंद्र पुरोहित, मुकुंद पुरोहित, स्पर्धा सचिव ऋषिकेश बंग आदी मान्यवर उपस्थित होते. टी. एस. सत्यनारायण यांनी चेंडू लाथाडून व संघातील खेळाडूंची ओळख करुन स्पर्धेचे उद्घाटन केले. पहिल्या सामन्यात डीयूएफसी संघाने मॅजिक स्पोर्ट्स क्लब अ चा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात डीयूएफसीच्या प्रणीत सप्लेने एकमेव गोल केला.
दुसऱ्या सामन्यात बिटा एफसीने रेग एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. बिटाच्या प्रणवने एकमेव गोल केला. तिसऱ्या सामन्यात डीयूएफसीने बिटा संघाचा 3-0 असा पराभव केला. डीयूएफसीतर्फे अभय, ध्रुव, प्रणीत यांनी प्रत्येकी एक गोल केला. चौथ्या सामन्यात ब्ल्यूलॉक एफसीने पीसीएफसीचा 2-0 असा पराभव केला. ब्ल्यूलॉकतर्फे प्रतिक व रितेश यांनी गोल केले. पहिल्या उपांत्य सामन्यात डीयूएफसीने करनाडू एफसीचा टायब्रेकरमध्ये 13-12 अशा गोलफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेग एफसीने मॅजिक स्पोर्टिंग संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 8 व्या मिनिटाला सिद्धांतच्या पासवर संकेतने पहिला गोल केला. तर 14 व्या मिनिटाला सिद्धांतच्या पासवर फरानने दुसरा गोल करुन पहिल्या सत्रात 2-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 31 व्या मिनिटाला संकेतच्या पासवर सिद्धांतने गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग संघाला गोल करण्यात अपयश आले. अंतिम सामन्याचे उद्घाटन पुरस्कृर्ते अमोदराज स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमोद भिंगे, टी. एस. सत्यनारायण, स्पर्धा सचिव ऋषी बंग यांनी खेळाडूंची ओळख करुन सामन्याला सुरुवात केली. या सामन्यात सातव्या मिनिटाला डीयूएफसीच्या अर्पित परमशेट्टीने सुरेख गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात रेग एफसीच्या सिद्धांतच्या पासवर श्रेयशने गोल करुन 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचे गोलफलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला.
त्यामध्ये डीयूएफसीने 5-4 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे अमोदराज भिंगे, टी. एस. सत्यनारायण, ऋषी बंग यांच्या हस्ते विजेत्या डीयूएफसी व उपविजेत्या रेग एफसी संघाला आकर्षक चषक, प्रमाणपत्र, खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्ट्रायकर श्रेयस (करुनाडू), उत्कृष्ट गोलरक्षक पास्कल (रेग एफसी), स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रणीत सप्ले (डीयूएफसी) यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, ओवेस तेरणी, शुभम सुतार, सुदर्शन जाधव यांनी काम पाहिले.









